लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवाजीनगर जाफरखान चौक भागात मनपाने काही वर्षांपूर्वी ४० शौचालये बांधली होती. मात्र, ही शौचालये मनपाने तोडली असून, कोणतीही पर्यायी व्यवस्था मनपाने केलेली नाही. त्यामुळे पूर्वीच्या जागेवरच शौचालये बांधण्यात यावीत या मागणीसाठी शिवाजीनगर भागातील शिवसेनेकडून उपमहापौर सुनील खडके यांच्या जनता दरबारात मोर्चा आणण्यात आला. यावेळी प्रशासन व सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करून स्थानिक नागरिकांनी व शिवसैनिकांनी मनपा परिसर दणाणून सोडला होता.
शिवाजीनगर शिवसेना विभागप्रमुख विजय बांदल यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा महापालिकेत आणण्यात आला. उपमहापौरांचा जनता दरबारातच शिवसैनिकांनी ठिय्या मांडत, जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले होते की, शिवाजीनगर भागात स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत शौचालये बांधण्यात आली होती. मनपाने यासाठी ५ लाख रुपयेदेखील खर्च केले. मात्र, दोन महिन्यांपूर्वी मनपा प्रशासनाने स्थानिक नागरिकांना कोणतीही सूचना न देता सर्व ४० शौचालये मनपाने तोडली. यामुळे या भागातील नागरिकांवर उघड्यावर शौच करण्याची वेळ आली असून, आता मनपाने नवीन शौचालयांचे काम हाती घेतले असून, ही शौचालये तोडण्यात आलेल्या शौचालयांच्या जागेवरच बांधण्यात यावीत, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. महापौर व उपमहापौरांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेऊन, यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शिवसैनिकांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र, आठवडाभरात मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.