लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : येथील महापालिकेत ऐतिहासिक सत्तांतर करत शिवसेनेने महापालिकेवर आपला भगवा फडकवला आहे. भाजपमधून शिवसेनेत येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने काही पदाधिकाऱ्यांना महापालिकेत संधी देण्यात यावी, यासाठी पक्षाने स्वीकृत नगरसेवक अमर जैन यांचा राजीनामा मागितला होता. मात्र, स्वीकृत नगरसेवक पदाच्या एका जागेसाठी अनेकजण इच्छुक असल्याने शिवसेना नेतृत्वाची अडचण झाली असून, गुरुवारी राजीनामा देण्यासाठी जाणाऱ्या अमर जैन यांचा राजीनामा थांबवला असल्याची माहिती शिवसेनेच्या अधिकृत सुत्रांनी दिली.
महापालिकेत शिवसेनेचे एकूण १५ नगरसेवक आहेत. बारा नगरसेवकांच्या मागे एक स्वीकृत नगरसेवक असल्याने शिवसेनेने अमर जैन यांना संधी दिली होती. गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक म्हणून अमर जैन हे महापालिकेत काम करत आहेत. आता महापालिकेत सत्ता आल्याने स्वीकृत नगरसेवक पदासाठी अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली होती.
शिवसेनेकडे इच्छुकांचा फौजफाटा तयार
स्वीकृत नगरसेवकाच्या एका जागेसाठी शिवसेनेकडून राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले नीलेश पाटील, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, नितीन सपके, सविता माळी-कोल्हे, खुबचंद साहित्य, विराज कावडीया यांची नावे आघाडीवर आहेत.
भाजप आपल्या स्वीकृत नगरसेवकांना कायम ठेवणार
महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीनंतर भाजपकडून आपल्या स्वीकृत चारही नगरसेवकांचा राजीनामा घेण्यात येणार होता. मात्र, महापालिकेत झालेल्या राजकीय घडामोडीनंतर भाजपची सत्ता गेल्यामुळे भाजपने आता आपल्या चारही नगरसेवकांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. स्वीकृत नगरसेवकांचा राजीनामा घेतल्यास केवळ दोन नगरसेवकपद भाजपकडे उरतील, या भीतीने भाजपने आपल्या चारही स्वीकृत नगरसेवकांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.