जीर्ण झालेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या जागी सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासनातर्फे नवीन उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. सुरुवातीला रेल्वे प्रशासनाने
त्यांच्या हद्दीतील गर्डर काढण्याचे काम केल्यानंतर, लागलीच सार्वजनिक बांधकाम विभागाने नियुक्त केलेल्या मक्तेदारामार्फत कामाला सुरुवात करण्यात आली होती. यावेळी
बांधकाम विभागातर्फे नागरिकांच्या सोयीसाठी अवघ्या १८ महिन्यात पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे शिवाजीनगरवासीयांना आश्वासन देण्यात आले होते. मात्र, रेल्वेतर्फे मुख्य गर्डर काढण्याच्या कामाला झालेला विलंब आणि त्यात कोरोनामुळे सहा महिने हे काम बंद असल्यामुळे पुलाच्या उभारणीचे काम चांगलेच रखडले. दरम्यान, पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी गेल्या महिन्यात शिवाजीनगरचे नगरसेवक नवनाथ दारंकडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांचींही भेट घेतली होती.
इन्फो :
दोन वर्षांत निम्मेच काम :
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे १२ फेब्रुवारी २०१९ रोजी उड्डाणपुलाच्या कामाचे आदेश संबंधित मक्तेदाराला देण्यात आले होते. २४ महिन्यात म्हणजे १२ फेब्रुवारी २०२१
पर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, सद्या स्थितीला या पुलाचे काम निम्मेच झाले असल्याचे बोलले जात आहे.
इन्फो :
सद्या शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या ठिकाणी पायाभरणीसह इतर पिलरचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, जोपर्यंत मनपा येथील विद्युत खांब हटविण्यासाठी निधीची तरतूद करत नाही,
तसेच या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन स्थलांतर करीत नाही, तोपर्यंत पुलाचे काम बांधकाम विभागातर्फे वेगाने होऊ शकत नाही. हे अडथळे दूर केल्यावर आम्ही चारच
महिन्यात पुलाचे काम पूर्ण करतो.
प्रशांत सोनवणे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग