जळगाव,दि.19- शहरातील शिवम वानखेडे हा कलर्स मराठी चॅनलवरील ‘2 मॅड’ या नृत्य स्पर्धेचा विजेता ठरला आहे. शिवमला ‘2 मॅडची’ ट्रॉफी व 2 लाख रुपयांचा धनादेशाचे पारितोषिक कार्यक्रमाचे परीक्षक संजय जाधव, नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव व मराठी सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या हस्ते देण्यात आले.
17 रोजी रात्री 9.30 वाजता शिवमने गोविंदाच्या हिट गाण्यांवर नृत्य केले. त्यावेळी शिवमने सांगितले की, ‘2 मॅड’ च्या ट्रॉफीला मुंबईहून जळगावला यायचे आहे असे सांगितले होते. त्यानुसार शिवमने आपले शब्द खरे करून दाखविले आहेत. यावेळी शिवमचे वडील शिरीष वानखेडे, आई सुवर्णा वानखेडे तसेच त्याच्या बहिणी व नृत्यशिक्षक अखिल तिलकपुरे उपस्थित होते.
चार महिने सराव
या स्पर्धेसाठी शिवमने चार महिने मुंबईला सराव केला. शिवमने या ट्रॉफीसाठी मराठी लावणी डोळ्यावर पट्टी बांधून नृत्य केले. त्याला गोविंदा ही पदवी परीक्षकांनी दिली. तसेच भविष्यात शिवम हा मोठा नृत्य दिग्दर्शक होईल अशी अपेक्षा परीक्षकांनी व्यक्त केली आहे. स्पर्धेत शिवम प्रथम ठरला असून, मुंबईचा राहुल कुलकर्णी हा व्दितीय तर मुंबईचीच सोनल विचारे ही तृतीय ठरली आहे.
शिवम ने केलेल्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळविले आहे. त्याच्या या यशात जळगावकरांचे फार मोठे योगदान आहे. नृत्यशिक्षक अखिल तिलकपुरे यांचे देखील मी आभार मानतो.
-शिरीष वानखेडे, शिवमचे वडील
वर्षभरातच तनय नंतर जळगावच्या शिवमने मोठय़ा स्पर्धेत यश मिळविले आहे. त्याच्या या यशामुळे जळगावचे नाव पुन्हा देशभरात पोहचले आहे. शिवमने घेतलेल्या मेहनतीमुळे, जळगावकर व प्रसारमाध्यमांनी दिलेल्या साथमुळेच हे यश मिळाले.
-अखिल तिलकपुरे, शिवमचे नृत्यशिक्षक