जळगाव : मनपाच्या लोकशाही दिनात आयुक्त व उपायुक्तांना अरेरावी व शिवीगाळ केल्याच्या दाखल गुन्ह्यात जिल्हा जागृत जनमंचचे शिवराम पाटील व अनील नाटेकर यांना मंगळवारी अटक करण्यात आली. सोमवारी महापालिकेत पाटील व नाटेकर यांनी लोकशाही दिनाच्या कार्यक्रमात गोंधळ घातला होता. उपायुक्त लक्ष्मीकांत कहार व अधिकारी हे सभागृहाबाहेर आले असता त्यांच्याशी पाटील व नाटेकर यांनी असभ्य वर्तन करत शिविगाळ केली होती. त्यांच्या या कृत्याच्या निषेधार्थ मनपा अधिकारी व कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन करुन दोघांवर कारवाईची मागणी केली होती. लक्ष्मीकांत कहार यांच्या तक्रारीवरून शहर पोलीसात या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल होता. दरम्यान, या घटनेनंतर पाटील व नाटेकर जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. मंगळवारी या दोघांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. बुधवारी दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांनी सांगितले. यापूर्वीच्या महासभेतील गुन्ह्यातही कारवाईची मनपा अधिकारी वर्गाकडून पोलिसांकडे मागणी करण्यात आली आहे.
शिवराम पाटील, नाटेकर यांना अटक
By admin | Published: January 04, 2017 12:37 AM