जळगाव : पाळधी बायपासच्या नजीक असलेल्या टोलकाट्यावर जात असलेल्या दुचाकीस्वाराला समोरुन येणाऱ्या एस.टी.बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात हुकुमचंद केशव पाटील (५०, रा.गट क्र.५२,शिव कॉलनी, जळगाव, मुळ गाव खर्डी, ता.चोपडा) हे जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पावणे पाच वाजता घडली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हुकुमचंद पाटील हे आनंद गिरधारीलाल ओसवाल (रा.जळगाव) यांच्या मालकीच्या टाकरखेडा शिवारातील शेती व्यवस्थापनाचे काम पाहत होते. सोमवारी शेतातील केळी काढली जात होती व त्याचा ट्रक टोलनाक्यावर वजन करण्यासाठी आलेला होता. त्यासाठी पाटील हे घरुन दुचाकीने थेट टोल काट्यावर जायला निघाले. काटा काही अंतरावर असतानाच हा अपघात झाला. विशेष म्हणजे त्यांच्या डोक्यात हेल्मेट होते.वडीलांच्यामागे मुलगाही येत होता शेतातअपघाताची माहिती मिळाल्यानंतर आनंद ओसवाल व घटनास्थळावरील लोकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना जळगाव शहरात आणले. दोन खासगी दवाखान्यात नेल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी पाटील यांना मृत घोषित केले. या अपघाताच्यावेळी पाटील यांचा मुलगा राहूल हा देखील याच रस्त्याने शेताकडे दुचाकीने जात होता. त्याला घटनास्थळावरच हे दृष्य दिसले. वडीलांची अवस्था पाहून त्याने एकच हंबरडा फोडला. रुग्णालयातही त्याचा आक्रोश सुरुच होता. जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील व इतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय गाठून मदतकार्य केले. रुग्णालयातील हवालदार दिनकर खैरनार यांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.
शिवशाही एस.टी.बसने दुचाकीस्वाराला उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:35 PM