संजय पाटील /ऑनलाईन लोकमत
अमळनेर,दि.30 - मृत्यू ही अटळ बाब आहे. मृत्यूनंतर त्याचे विधीवत अंत्यसंस्कार हा मानवी जीवनातील शेवटचा संस्कार असतो. मात्र अमळनेर तालुक्यातील मारवड येथील सुरेश साळुंखे यांचे कुटुंब कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार नव्हे तर एखाद्या राजाची शोभायात्रा काढावी तसा उत्सव साजरा करतात.
मारवड येथील साळुंखे परिवारात मृत्यू झाल्यानंतर दु:ख व्यक्त न करता आनंद व्यक्त केला जातो. कैवल्य सत विज्ञान विधी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. अशा परिवारानां राम स्नेही परिवार संबोधले जाते. माणूस जन्माला आल्यानंतर जसा आंनद व्यक्त केला जातो, तसाच तो मृत झाल्यावरही व्यक्त करावा हे तत्व अनुसरून अंत्ययात्रा नव्हे तर शोभायात्रा काढली जाते. लाकडी वैकुंठी किंवा डोली तयार करून मृत व्यक्तीला ध्यान करत आहे, अशा पद्धतीने बसवून वाजंत्री लावून घोडे , उंट, हत्ती , यावर शिलेदार बसवून स्मशानाच्या दिशेने शोभा यात्रा काढली जाते. आणि विशेष म्हणजे यात महिलाही मोठय़ा संख्येने सहभागी होतात. रस्त्याने जाताना हरी जसगायन , रामनाम स्मरण केले जाते. महिला स्मशानात ही येतात. या पद्धतीत अनिष्ट रूढी जसे सुतक, केस देणे, गंधमुक्ती, उत्तरकार्य, विधी केला जात नाही. अग्निडागही परिवारातील कोणीही देतो. तसेच श्राद्ध, पुण्यतिथी असे काहीच केले जात नाही. स्मशानात लोकांना खायला आणि पाणी याचीही व्यवस्था केली जाते. व्यक्तीला जिवंतपणीच जे काही खाऊ घालायचे ते खाऊ घालतात. मेल्यानंतर पितर किंवा श्राद्ध घातले जात नाही. तसेच सुतकाचे दिवस पाळण्यापेक्षा राम नामाचे स्मरण करून रामद्वार पद्धतीची माहिती दिली जाते. व्यक्तीचे निधन अपघाती असो की नैसर्गिक किंवा व्यक्ती तरुण असो किंवा म्हातारी शोभायात्रेत सर्व जण महिलांसह जल्लोष आनंद व्यक्त करतात.