जळगाव : बहिणीकडे सकाळी नाश्ता केल्यावर जेवणाचा डबा पाठवून दे असे सांगून घरातून निघालेल्या शेख इरफान शेख याकुब मनियार (वय ४५, सालार नगर) या भावाने धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. या घटनेत शेखर इरफान यांच्या शरीराचे दोन तुकडे पडले. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अजून तरी समोर आलेले नाही.
नातवाईकांनी दिलेल्या माहितीनसार, शेख इरफान शेख याकुब मनियार सालार नगरातील हाजी अहमद नगरात आई फातेमाबी, पत्नी रुखसानाबी, मुलगा मुजाहिद, जयद, भाऊ सलीम व बहिणी यांच्यासह वास्तव्याला होते. सराफ बाजारात भवानी मंदिराजवळ त्यांचा बांगड्यांचा व्यवसाय होता. त्यावरच कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. पत्नी रुखसानाबी या दोन दिवसापूर्वीच मुजाहिद व जयद या दोन मुलांसह नंदूरबार माहेरी गेलेल्या होत्या. त्यामुळे शेख इरफान हे घरी एकटेच होते. गुरुवारी सकाळी ८ वाजता ते दुचाकीने शिरसोली येथील मोठी बहिण मलेकाबी यांच्याकडे गेले. सकाळी तेथे नाश्ता केला. माझ्यासाठी कामावर डबा पाठवून दे असे बहिणीला सांगून घराबाहेर पडले. शिरसोली रेल्वे स्थानकाजवळ त्यांनी दुचाकी लावून धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी १० वाजता उघडकीस आला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे यशोधन ढवळे व समाधान टहाकळे घटनास्थळी धाव घेतली. शेख इरफान यांचे दोन तुकडे झालेले होते. खिशात चिठ्ठी किंवा काही आढळून आले नाही. मात्र पोलिसांनी मोबाईल जप्त केला आहे. त्यात काही मिळतं का त्यादृष्टीने तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.