लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरात लाखो नागरिकांचे बळी गेलेले आहेत. जळगाव जिल्ह्यातदेखील आतापर्यंत सुमारे २ हजार नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अनेक कुटुंब यामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. मात्र, दुसरीकडे कोरोनामुळे दररोज होणाऱ्या मृतांच्या संख्येवरदेखील सट्टा लावून पैसे कमावले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. जळगाव जिल्ह्यासह अनेक भागांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येवर लाखोंचा सट्टा लावून पैसे कमावण्याचा अमानवीय प्रकार घडत आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर सट्टा लावला जात होता. मात्र, आता दररोजच्या रुग्णांच्या संख्येसोबतच मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येवरदेखील सट्टा लावला जात आहे. यासाठी राज्यभरातील अनेक बुकी या सट्टा प्रक्रियेमध्ये गुंतलेले असल्याचीही माहिती सट्टा बाजारातील काही विश्वसनीय सुत्रांनी दिली. यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून दररोज जाहीर होणाऱ्या कोरोनाच्या अहवालावर सट्टा बाजाराचेदेखील लक्ष असल्याचे समोर येत आहे. यासह अनेक बुकी वृत्तपत्र, डिजिटल माध्यम व सोशल मीडियाच्या आधारावरून दररोजच्या संख्येवर सट्टा लावून पैसे कमवले जात असल्याचाही प्रकार सध्या सट्टा बाजारात घडत आहे.
रुग्ण संख्या वाढल्यानंतर सुरू झाला सट्टा बाजार
कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यावेळेसदेखील दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या व सट्टा लावला जात होता. त्यानंतर नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यात रुग्ण संख्येत घट आल्यानंतर कोरोनावरील सट्टा जवळपास बंद झाला होता. मात्र, मार्च महिन्यापासून रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर पुन्हा बुकींची नजर कोरोनाचा रुग्णसंख्येकडे वळली असून , दररोज यामधून लाखोंची उलाढाल होत असल्याचीही माहिती सट्टा बाजारातील सुत्रांनी दिली आहे.
...असा लावला जातोय सट्टा
जळगाव जिल्ह्यात दररोज २० ते २५ रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे होत आहे. दररोज जिल्हा प्रशासनाकडून ही माहिती सार्वजनिक केली जाते. तसेच डिजिटल माध्यमांसाठी प्रत्येकाच्या व्हॉट्सॲपवरदेखील ही माहिती आता सायंकाळी प्राप्त होऊन जाते. गेल्या महिनाभरातील मृतांची संख्या पाहिल्यास १५ ते २५ दरम्यान राहात आहे. त्यानुसार हा सट्टा लावला जातो. २० या संख्येवर सद्यस्थितीत सर्वाधिक बोली लावली जात आहे. २० या संख्येवर सध्या २५ पैसे इतका भाव असून, २२ वर ३५ पैसे, तर १८ ते १९वर ५० पैसे इतका भाव निश्चित करण्यात आला आहे. दररोज होणाऱ्या मृत्यूच्या संख्येची आकडेवारी वरील, सरासरी काढून केवळ १५ ते २५ या दहा आकड्यांच्या संख्येवर बोली लावली जात आहे. यासह दररोज आढळून येणाऱ्या रुग्ण संख्येवरदेखील बोली लावली जात असल्याची माहिती सट्टा बाजारातील काही बुकींनी दिली आहे.
अमानवीय प्रकार
कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालेले आहेत, रुग्णांना शहरात बेड उपलब्ध होत नसून ऑक्सिजनचीदेखील मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. त्यात रेमडेसिविरसारख्या इंजेक्शनसाठी नागरिकांना हजारो रुपये मोजावे लागत आहेत. अनेकांनी या आजारात आपले नातेवाईक गमावले आहेत, अनेक कुटुंब या आजारात उदध्वस्त झालेली आहेत. अशा परिस्थितीत मृत्यूच्या संख्येवर सट्टा खेळला जात आहे व त्यातून पैसे कमावण्याचा हा मानवीय प्रकार सध्या घडत आहे. आतापर्यंत निवडणुकीचे निकाल, क्रिकेट मॅचचे सामने यावरच सट्टा खेळला जात होता. मात्र, कोरोनासारख्या महामारीवरदेखील आता सट्टा खेळला जात आहे.