जळगाव - १७ दिवसांपूर्वीच पुनर्स्थापना झालेल्या जळगावातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयातच ऑन ड्युटी अधिकारी व कर्मचारी मद्यप्राशन करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकाराचा एक व्हिडिओ गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओत तीन जण मद्यप्राशन करण्यासाठी एका ठिकाणी बसल्याचे दिसून येत असून, त्यांच्यासमोर टेबलवर पाणी तसेच मद्याची बाटली, ग्लास दिसून येत आहेत. त्यांच्या जोडीला चखणा अर्थात खाद्यपदार्थाच्या प्लेटही टेबलवर ठेवलेल्या दिसत असून या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे.
आकाशवाणी केंद्रामागे असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या या कार्यालयात १९ जुलै रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत धुळे, नंदुरबार आणि जळगाव अशा तीनही जिल्ह्यांचे एकत्रित कार्यालय सुरू करण्यात आले. तीनही जिल्ह्यांशी निगडित कामकाज आता याच कार्यालयातून सुरू असून कार्यालय सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच येथे मद्य पार्टी रंगू लागल्याचा एक व्हिडिओ गुरुवारी दुपारपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे व तो कोणी केला आहे, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र हा या व्हिडिओविषयी अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.
दोषींवर कारवाई
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यालयात हा प्रकार बुधवारी दुपारी साडेचार वाजेनंतरचा असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. व्हिडिओत दिसणारे त्याच कार्यालयातील अधिकारी आहेत की कर्मचारी? हे देखील स्पष्ट झालेले नाही. मात्र या प्रकाराची चौकशी होऊन कारवाई करण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहे.
कार्यालयात मद्यप्राशन होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याविषयी माहिती मिळाली आहे. हा व्हिडिओ पाहून त्यात कोण आहे व घडलेल्या प्रकाराची चौकशी केली जाईल. असा प्रकार घडला असेल तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. - एस.व्ही. निकम, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण