जळगाव : अनैतिक संबधाच्या संशयावरून प्रियकराने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणा-या प्रेयसीचा लोखंडी वजन मापाने डोक्यावर आणि सुरीने पाठीवर सपासप वार करून हत्या केली़ ही धक्कादायक घटना रामेश्वर कॉलनी भागातील तुळजामाता नगरात गुरूवारी मध्यरात्री ३ वाजता घडली़ विशेष म्हणजे, प्रेयसीची हत्या केल्यानंतर तिला दोरीच्या साहाय्याने गळफास देण्यात आला होता. वंदना गोरख पाटील (४५, मूळ रा. सावखेडा बुद्रूक) असे मयत प्रेयसीचे नाव असून दुपारी चोपड्यातून प्रियकर सुरेश सुकलाल महाजन (५३, रा. रामेश्वर कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
अशी घडली घटना...
आदर्श नगरातील रमेश पुंडलिक सानप यांच्या मालकीच्या तुळजा माता नगरातील घरात वंदना पाटील या मुलगा दीपक व सून अमृताबाई यांच्यासह १ जूनपासून भाड्याने राहत होत्या. पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे भाजीपाला विक्री करून त्या स्वत:चा उदरनिर्वाह करायच्या. दरम्यान, २० ते २१ वर्षांपूर्वी भाजी मार्केटमध्ये वंदना पाटील या भाजीपाला घेण्यासाठी येत-जात असल्याने त्यांची ओळख सुरेश महाजन यांच्याशी झाली. नंतर दोघांचे प्रेमसंबंध जुळले. हळू-हळू एकमेकांच्या घरी येणे-जाणे होत होते़ रामेश्वर कॉलनीत वंदना या रहायला आल्यानंतर त्यांना घरभाड्यासाठी सुरेश हे पैसे देत होते. मात्र, नेहमीच पैशांची मागणी होत असल्यामुळे दोघांमध्ये वाद होत होते. त्यातच त्या नेहमी फोनवर बोलत असल्याने सुरेश यांना वंदना यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. गुरूवारी रात्री १०़४५ वाजता सुरेश हे वंदना यांच्या घरी आले. जेवण वाढण्यावरून वाद झाला. जेवनानंतर दोघेही रात्र झोपी गेले. पहाटे ४ वाजता सुरेश याला अचानक जाग आली व त्याने वंदना हिला पिण्यासाठी पाणी मागितले. मात्र, तुझ्या हाताने पाणी घे असे उत्तर मिळाल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. नंतर सुरेश यांनी थाप मारल्यानंतर तिने लोखंडी वजनाचे माप डोक्यावर मारले. त्यानंतर कांदा कापण्याचा सुरा घेवून त्याने वंदना यांच्या पाठीवर सपासप वार केले. इतकेच नव्हे तर दोरीच्या सहाय्याने गळफास दिला. त्यामुळे वंदना पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
मुलाचा फोन आल्यामुळे झाली घटना उघड
पाटील यांचा मुलगा दीपक व सून हे दोघे लातूर येथे गेले होते़ त्यामुळे शुक्रवारी सकाळी ९ वाजता दीपक याचा घराच्या वरती राहणा-या कुणाल पाटील या तरुणाला फोन आला. आईशी बोलायचे असल्याचे सांगत त्याने फोन देण्यास सांगितले. कुणाल खाली आल्यानंतर त्याने खिडकीतून घराच्या आत डोकावून पाहिले असता समोर वंदना या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर जखम आणि गळफास दिल्याचे दिसून आले. त्याने लागलीच कुटुंबीयांना कळविले.