महिलेची हत्या झाल्याची माहिती मिळताच, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले तसेच रामानंदनगर पोलीस निरीक्षकांसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. यावेळी पोलिसांनी संपूर्ण घराची पाहणी केली. नंतर खुनासाठी वापरलेल्या हत्याराचा पोलिसांनी शोध घेतला. मात्र, काहीही आढळून आले नाही. परंतु, रक्ताचे डाग ठिकठिकाणी पोलिसांना मिळून आले. घरमालक यांनाही विचारपूस केल्यानंतर महिलेच्या घरी सुरेश माळी हा व्यक्ती अधून-मधून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ठसे तज्ज्ञांचे व श्वान पथक दाखल
दुपारी बारा वाजता श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी ठसे तज्ज्ञांच्या टीमकडून घरात काही पुरावा मिळतो का? याचा शोध सुरू होता. तर दुसरीकडे घरात मिळालेली जिन्स पँट श्वान पथकाला दाखविल्यानंतर केवळ काही अंतरापर्यंत त्याने मार्ग दाखविला़ तर घरात गुंडाळलेल्या गादीचीसुध्दा पोलिसांनी पाहणी केली.
बहिणीचा मृतदेह पाहून भावाचा आक्रोश
आईची कुणीतरी हत्या केल्याची माहिती दीपक याने चोपडा येथे राहणारे मामा भरत पाटील यांना दिली, त्यांनी लागलीच दुपारी जळगाव गाठले. घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी एकच आक्रोश केला. त्यांची विचारपूस केल्यानंतर ते वंदना पाटील यांचे भाऊ असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडूनही माहिती जाणून घेतली. त्यात त्यांनी पंधरा-वीस दिवसांपूर्वी बहिणीशी बोलणे झाले असल्याचे सांगितले.
मृतदेह हलविला रुग्णालयात
पोलिसांकडून संपूर्ण पाहणी आणि पंचनामा झाल्यानंतर मृतदेह दुपारी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. त्यानंतर घरमालक रमेश सानप यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयिताच्या शोधार्थ पथक चोपड्याला
दरम्यान, वंदना यांचा गुरुवारी एका व्यक्तीसोबत वाद झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. तर सुरेश माळी यांच्यावर पोलिसांना संशय बळावल्यानंतर त्याच्या मुलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. नंतर एक पथक सुरेश याच्या शोधार्थ चोपड्याला रवाना झाले होते.