लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : धरणगाव येथून गरोदर महिलेला घेऊन येणाऱ्या १०८ या ॲम्बुलन्समधील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात वाहनाच्या चिंधड्या होऊन त्याचे अवशेष दीडशे फूट उंच उडाले. तर तब्बल ५०० मीटर अंतरापर्यंत या स्फोटाचे हादरे बसले. चालकाच्या समयसूचकतेमुळे ॲम्बुलन्समधील रुग्ण, त्याचे नातेवाईक, डॉक्टरचे प्राण वाचले आहेत. अग्निशमन दलाच्या दोन बंबाद्वारे आग विझविण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री ९:१५ ते ९:३० वाजेच्या दरम्यान महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपाच्या पुलावर घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव येथून एम.एच.१४ सी.एल.०७९६ ही १०८ ॲम्बुलन्स गरोदर महिलेला घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येत असताना महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपाच्या उड्डाणपुलाजवळ गियर बदल करीत असताना आगीची ठिणगी उडाली. काही तरी गडबड असल्याचा अंदाज आल्याने चालक राहूल बाविस्कर याने वाहन रस्त्याच्या बाजूला घेतले. वाहनातील डॉ.रफिक अन्सारी, रुग्ण, व नातेवाईक या सर्वांना खाली उतरविले. त्याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या ॲम्बुलन्समध्ये बसवून त्यांना रुग्णालयात रवाना केले. हे वाहन काही अंतरावर पुढे सरकताच ॲम्बुलन्समधील ऑक्सिजन सिलिंडरचा जोरात स्फोट झाला. क्षणातच वाहनाच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्या. आगीच्या ज्वाला आणि सिलिंडर दीडशे फूट उंचापर्यंत उडाले. फुटलेले सिलिंडर रस्त्याच्या दुसऱ्या कडेला तर रिकामे असलेले सिलिंडर वाहनाजवळ पडले. पुलाच्या खाली वाहनाचा पत्रा उडाला.
बघणाऱ्यांचा उडाला थरकापस्फोट व आगीचे दृश्य इतके भयंकर होते की बघणाऱ्यांचाही थरकाप उडत होता. आवाजामुळे निमखेडी शिवारापर्यंत भूकंपासारखे धक्के बसले. यामुळे झोपलेले वृध्द लोकही जागे झाले. या घटनेमुळे महामार्ग बंद झाला होता. घटनेचा धक्का बसल्याने चालकाला बराच वेळ काहीच उमजले नाही.अमर जैन धावले मदतीला
घटना घडली तेव्हा माजी नगरसेवक अमर जैन घरात जेवणाला बसले होते. आवाज पाहून त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले तर आगीच्या मोठ्या ज्वाला दिसत होत्या. जेवण सोडून त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्वात आधी चालक राहुल बाविस्कर याला लांब नेत अग्निशमन दल व पोलिसांना कळविले. दोन्ही यंत्रणा अवघ्या काही मिनिटातच दाखल झाल्या. दोन बंबाद्वारे आग विझविण्यात आली. चालकामुळे ॲम्बुलन्समधील रुग्ण वाचले तर अमर जैन यांच्यामुळे चालक सुरक्षित राहिला. जैन व पोलिसांनी वाहतूक वळविली.
अमित शाहांच्या ताफ्यात होती ॲम्बुलन्सज्या ॲम्बुलन्सचा स्फोट झाला ती दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ताफ्यात होती, अशी माहिती १०८ चे व्यवस्थापक राहुल जैन यांनी दिली. सुदैवाने त्यावेळी काही घटना घडली नाही. एक सिलिंडर ऑक्सिजनने भरलेले होते तर दुसरे रिकामे होते. भरलेल्या सिलिंडरचे स्फोटामुळे तुकडे-तुकडे झाले आहेत.