संतप्त जमावाकडून वाहनाची तोडफोड
जळगाव,दि.14-एका रुग्णवाहिकेतून गुरांची अवैध वाहतूक करण्याचा धक्कादायक प्रकार जळगावातील औद्योगिक वसाहत परिसरात उघडकीस आला आहे. जळगावकडून औरंगाबादकडे रुग्णवाहिकेतून गुरे घेऊन जात असताना औद्योगिक वसाहतमध्ये एका रिक्षाला धक्का लागल्याने रिक्षा चालकाने वाहन थांबविल्याने हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एकच गर्दी झाली व संतप्त जमावाने वाहनाची तोडफोड केली.
या रुग्णवाहिकेत सहा गुरे होती. त्यापैकी 2 मृत अवस्थेत आढळून आले आहेत. चार जीवंत गुरांची मुक्तता केल्यानंतर त्यांची रवानगी कुसुंबा येथील गो शाळेत करण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळी रुग्णवाहिका सोडून चालक फरार झाला आहे. वाहन पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.