लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव / नशिराबाद : जळगाव खुर्द येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील न्यायाधीन बंदी रूमजवळील स्वच्छतागृहाच्या छतावर पोलिसांना एक गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतूस आढळून आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव खुर्द येथे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर कारागृहातील न्यायाधीन बंदींसाठी उपचारासाठी खोली आहे. या खोलीच्या शेजारी असलेल्या स्वच्छतागृहाच्या छतावर कुणीतरी गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतूस लपविल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आला. हा प्रकार रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कळताच, त्यांनी नशिराबाद पोलिसांशी संपर्क साधला. नशिराबाद पोलीस ठाण्याचे निरीक्षक बशीर शेख, राजेंद्र साळुंखे, प्रवीण ढाके, शिवा चौधरी यांनी रुग्णालयात जावून पिस्तूल व काडतूस ताब्यात घेतले. त्यानंतर याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे पिस्तूल रुग्णालयात कोणी आणले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.