जळगाव : रामेश्वर कॉलनी भागातील तुळजामाता नगरात राहणाऱ्या भाजीपाला विक्रेत्या महिलेची अज्ञात व्यक्तीने डोक्यात वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. विशेष म्हणजे, महिलेची हत्या केल्यानंतर तिला दोरीच्या साहाय्याने गळफास देण्यात आला होता. वंदना गोरख पाटील (४२, मूळ रा. सावखेडा बुद्रूक) असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदर्श नगरातील रमेश पुंडलिक सानप यांच्या मालकीच्या तुळजामाता नगरातील घरात वंदना पाटील या १ जूनपासून भाड्याने राहत होत्या. पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे भाजीपाला विक्री करून त्या स्वत:चा उदरनिर्वाह करतात. मुलगा दीपक हा लातूर येथे गेलेला असल्यामुळे त्या घरी एकट्या राहत होत्या. दरम्यान, गुरुवारी रात्री वंदना यांची अज्ञात व्यक्तीने डोक्यात तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून हत्या केली. इतकेच नव्हेतर, खून केल्यानंतर महिलेला दोरी व साडीच्या साहाय्याने घरातील दरवाजाला गळफास दिला आहे. डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मुलाचा फोन आल्यामुळे झाली घटना उघड
शुक्रवारी सकाळी मुलगा दीपक याचा घराच्या वरती राहणाऱ्या कुणाल पाटील या तरुणाला फोन आला. आईशी बोलायचे आहे, मोबाइल तिला दे, असे सांगितले. कुणाल खाली आल्यानंतर त्याने खिडकीतून घराच्या आत डोकावून पाहिले असता समोर त्याला दीपकची आई वंदना या रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर जखम आणि गळफास दिल्याचे दिसून आले. त्याने लागलीच कुटुंबीयांना कळविले. त्यानंतर खून झाल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली.