लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगावचे उपमहापाैर कुलभूषण पाटील यांच्यावर रविवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मंगलसिंह राजपूत, उमेश व महेंद्र राजपूत यांच्यासह तीन ते चार जणांनी कारमधून येत गोळीबार केल्याची घटना झाली. या घटनेनंतर पाटील यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला.
पिंप्राळा भागात रविवारी दुपारी क्रिकेट खेळण्यावरून दोन गटात हाणामारी झाली. या दोघांचा वाद सोडविण्यासाठी उपमहापाैर कुलभूषण पाटील हे रामानंद नगर पोलीस स्टेशनला गेले होते. याठिकाणी त्यांना एका गटाने शिवीगाळ केली. त्यानंतर पाटील हे संध्याकाळी आपल्या पिंप्राळ्यातील कार्यालयात आले असता त्यांना एका गटाने फोनवरून शिवीगाळ केली.
दरम्यान, रात्री पाटील हे अनिल यादव यांच्यासह दुचाकीने घराकडे जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर एक गोळी झाडली. त्यानंतर ते घराकडे पळाल्यानंतर मंगलसिंह राजपूत, उमेश राजपूत, महेंद्र राजपूत यांच्यासह बिऱ्हाडे नामक तरुणाने तीन गोळ्या झाडल्या. घटनेनंतर नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झाल्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढल्याची माहिती स्वत: कुलभूषण पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना दिली.