जळगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता देशभरात चौथा लॉकडाउन जाहीर झाला असून यात रेड झोनमधील शहर व गावांमध्ये विशेष खबरदारी घेऊन निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यातही प्रतिबंधित क्षेत्रात तर अधिकच निर्बंध कडक आहेत. जळगाव शहरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापना बंदचे आदेश आहेत, असे असताना शहरातील प्रमुख बाजारपेठेत मात्र प्रशासनाचे सारेच नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. मंगळवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत बळीराम पेठ, बोहरी बाजार, सराफ बाजार, फुले मार्केट व सुभाष चौक येथील अनेक दुकाने बाहेरुन लॉक तर आतून सुरू असल्याचे दिसून आले. बळीराम पेठेत तर स्थानिक तरुणांनी होलसेल कापड विक्रीच्या दुकानाचे चित्रीकरण करून हे दुकानच बंद केले.शहर व जिल्ह्यात कोरोना बाधित व मृत्यूची संख्या अधिक असल्याने जिल्ह्याचा रेड झोन मध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त नागरिकांनी घराबाहेर निघणेच अपेक्षित नाही. शहरात मात्र सकाळ पासून तर रात्रीपर्यंत रस्ते, बाजार पेठेतील गर्दी पाहता लॉकडाउन शिथील झाले की काय? असाच प्रश्न पडतो.बंदच्या नावाखाली कामगारांना घरी बसविले, दुसरीकडे व्यवसाय सुरूलॉकडाउनच्या नावाखाली अनेक दुकानातील कामगारांचे पोट डाऊन झाले आहे. काही दुकानदार मात्र स्वत:च दुकानात येऊन व्यवसाय सुरु ठेवत आहेत. बोहरी गल्लीत बाहेरुन दुकान बंद तर दुसरा दरवाजा सुरु ठेवून ग्राहकांना प्रवेश दिला जात होता. येथून काही अंतरावर जोशी पेठ आहे, ते प्रतिबंधित क्षेत्र आहे. त्याशिवाय कापड व इतर खरेदीसाठी येणारे ग्राहक हे भुसावळ, अमळनेर व पाचोरा येथीलच आहेत. या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. लपून छपून व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानेच ग्राहकही बिनधास्तपणे खरेदीसाठी येत आहेत. दुकाने बंद असल्याचा संदेश गेला तर एकही ग्राहक दुकानांकडे फिरणार नाही.बळीराम पेठेत लग्नाचा बस्ता थांबविलादुपारी अडीच वाजता बळीराम पेठेत वंदना साडी व त्रिशा साडी या होलसेल कापड दुकानाचे शटर बाहेरुन बंद होते, त्यांचा एक कर्मचारी बाहेर थांबून होता. आतमध्ये लग्नाचा बस्ता खरेदी सुरू होती. सोशल डिस्टन्सिगचे कोणतेही पालन येथे केले जात नव्हते. हा प्रकार स्थानिक रहिवाशी तरुणांना समजल्यानंतर त्यांनी दुकानावर धडक दिली. बाहेरुन शटर उघडले असता आतमध्ये महिला व पुरुष असे अनेक जण आढळून आले. या तरुणांनी दुकान उघडल्यापासून तर बंद होईपर्यंत सारे दृष्य मोबाईलमध्ये चित्रित केले. त्यानंतर कुठे दुकानदाराने दुकान बंद केले.पोलिसांचीही होतेय चांदी... सुभाष चौक, बळीराम पेठ, पोलन पेठ, कालिकां माता चौक यासह इतर ठिकाणी दुकाने सुरू असलेल्या ठिकाणाहून पोलीस हप्ता वसुली करीत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. मनपाचेही काही कर्मचारी चिरीमिरी घेऊन कारवाई करण्याऐवजी दुकानदारांना साहाय्य करीत असल्याचे दिसून आले.