लोकमत न्यूज नेटवर्क
पहूर, ता. जामनेर : बसस्थानक परिसराच्या जवळील कृषी पंडित काॅम्प्लेक्समध्ये असलेल्या दुकानात शाॅर्टसर्कीट झाल्याने आग लागल्याची घटना घडली. यात रोकडसह दुकानातील साहित्य जळून खाक झाले असून अंदाजे एक ते दीड लाखांच्या आसपास नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने मोठी वित्तहानी टळली आहे.
कृषी पंडित काॅम्प्लेक्समध्ये ज्ञानेश्वरी पतंजली आरोग्य केंद्र आहे. दुपारी दुकान बंद करून दुकानाचे संचालक जयंत मुकुंद जोशी घरी गेले होते. त्यावेळी अचानक दुकानातून आग व धूर शेजारच्या व्यावसायिक सुरेश गाजरे व कामगार सतीश पाटील यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने जयंत जोशींना बोलावून घेतले. सतीश पाटील, जयंत जोशी, सुरेश गाजरे व उपस्थित नागरिकांनी धावपळ करून आग विझवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला. यात बँकेचा तीस पस्तीस हजार रोकडचा भरणा व आयुर्वेदिक दुकानातील औषधी व इतर साहित्य जळून खाक झाले. या घटनेत जवळपास एक ते दीड लाखांच्या जवळपास नुकसान झाल्याचे जयंत जोशींनी सांगितले. घटनास्थळाची पोलीस कर्मचारी संतोष चौधरी व श्रीराम धुमाळ यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.
मोठी दुर्घटना टळली
घटना घडलेल्या दुकानाच्या परिसरात वीस ते पंचवीस दुकाने दाटीवाटीने आहेत. हा परिसर गजबजलेला आहे. लाॅकडाऊनमुळे दुकाने बंद होती. सुरेश गाजरे यांच्या निदर्शनास आग पडली नसती तर आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण गेले असते. यामुळे वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली. सुदैवाने मोठी हानी टळली आहे. शेजारीच जिल्हा परिषद माजी सभापती प्रदीप लोढा यांचे निवासस्थान आहे.