जळगाव : ईलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्याच्या नावाखाली मनीष गुरुमुखदास आहुजा (वय २४,रा. गणेशवाडी) या दुकानदाराची ४६ हजारात ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी बुधवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मनीष आहुजा या तरुणाचे चित्रा चौकात स्वामी ईलेक्ट्रॉनिक नावाचे दुकान आहे. १५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास त्यांना आनंद कुमार नाव्याच्या व्यक्तीचा फोन आला. मी इंडियन आर्मी मधून बोलत आहे. मला तुमच्या इलेक्ट्रॉनीक शॉपमधून एलईडी फोकस खरेद करायचे आहे, त्यासाठी किती रुपये लागतील अशी विचारणा केली. त्यावरुन मनीष यांनी काका पुरुषोत्तम आहुजा यांच्या क्रमांकावरुन आनंदकुमार नामक व्यक्तीच्या व्हॉटस्ॲपवर कोटेशन व रक्कम याची माहिती पाठविली. त्यावर आनंद कुमारने आहुजा यांच्या व्हॉटस्ॲपवर पेमेंट करण्यासाठी स्कॅनिंग कुपन पाठविले, तुम्ही स्कॅन करा तुम्हाला पेमेंट होवून जाईल असे सांगितले. नेटवर्क प्रॉब्लेम असल्याने मनीषचा मावस भाऊ चिराग गेही याच्या गुगल पे द्वारे कोड स्कॅन केला असता चिरागच्या बँक खात्यातून २४ हजार ९९९, १६ हजार ९९९ आणि ४ हजार ३०० असे एकूण तीन वेळा ४६ हजार २९८ रुपये खात्यातून परस्पर काढून घेतले. याबाबतचे संदेश मोबाईलवर प्राप्त झाल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मनीष आहुजा यांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
आर्मीतून बोलत असल्याचे सांगून दुकानदाराची ४६ हजारात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 8:02 PM