लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये गतवर्षीप्रमाणे यंदाच्याही अक्षय तृतीया व ईदला आर्थिक अरिष्ट ओढवले आहे. लॉकडाऊनमुळे दुकाने, शोरूम बंद असल्याने अनेकांना मुहूर्ताची खरेदी करता येणार नाही. दुचाकी व चारचाकी वाहनांची बुकींगच झालेली नाही. त्यामुळे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही या व्यावसायिकांची उलाढालच थंडावली आहे. विक्री होणार नसल्याने बाजारपेठेतील लाखो रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे.
गतवर्षी एप्रिलमध्ये अक्षय तृतीया हा सण होता. या सणाला कडक लॉकडाऊन असल्याने लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. यंदाही लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने यादिवशी सोने, चांदीचे दागिने, दुचाकी, चारचाकी वाहने आदी प्रकारची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. यंदा मात्र सर्व दुकाने बंद असल्याने मुहुर्ताची खरेदी होणार नसल्याने अनेकांच्या स्वप्नांवर पाणी पडले आहे.
दरवर्षी अक्षय तृतीयेला दुचाकी वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शोरुम बंद असल्याने कुणीही दुचाकी वाहनांची बुकिंग झालेली नाही. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहे; मात्र रोजचा खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार, बँक व्याज, शासकीय सर्व कराचा भरणा भरावा लागत आहे. कोरोनामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.
-वीरेंद्र भांडारकर, मोटार वितरक, चाळीसगाव.