जळगाव : ‘ब्रेक द चेन’दरम्यान किराणा दुकानांवर खरेदीच्या वेळा आता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत मर्यादित केल्याने या काळात ग्राहक दुकानावर यायला नको, असे असताना बुधवारी पहिल्या दिवशी मालाची वाहतूक बंद राहण्यासह होम डिलिव्हरीदेखील बंद होती. संभ्रमामुळे व्यावसायिकांनी दिवसभर आपली दुकाने बंद ठेवली. मालाची आवक जर बंद राहिली, तर टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने याबाबत स्पष्टता आणावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.
‘ब्रेक द चेन’मध्ये किराणा दुकान सुरू असल्याने त्या नावाखाली अनेक जण बाहेर फिरत आहेत, असे सांगत सोमवारी राज्य सरकारने किराणा दुकानांच्या वेळांवरदेखील मर्यादा आणली,तसेच जिल्हा प्रशासनानेदेखील मंगळवारी याविषयी आदेश काढले. यामध्ये किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे. नागरिकांनी रस्त्यावर दिवसभर फिरू नये यासाठी असे निर्बंध घातले असून, ग्राहकांना होम डिलिव्हरीसाठी, तसेच माल आणता यावा म्हणून मालवाहतुकीची परवानगी आहे. मात्र, याबाबत स्पष्टता नसल्याने बुधवारी पहिल्या दिवशी अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यवहार सकाळी ११ वाजेनंतर बंद ठेवण्यात आले. यामध्ये माल आणायचा झाल्यास पोलिसांनी वाहनांना अडवून त्यांना परत पाठविल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. असे झाल्यास माल येईल कसा व त्यातून टंचाई निर्माण होऊन भाववाढ होऊ शकते, असेही सांगितले जात आहे.
होमडिलिव्हरीमध्ये अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिक ग्राहकांना घरपोच माल देऊ शकतात, तसेच दाणाबाजारातून जिल्हाभरात माल जातो, त्यामुळे ते इतर ठिकाणीदेखील माल पाठवू शकतात. याशिवाय आपला माल मागवू शकतात. असे असताना बुधवारी हे सर्व ठप्प झाले होते.
त्यामुळे प्रशासनाने याविषयी विचार करून स्पष्टता आणावी व पोलिसांनाही योग्य सूचना देऊन मालाची आवक सुरू राहण्यासाठी मालवाहतुकीची वाहने अडवू नयेत व ग्राहकांना होमडिलिव्हरीसाठी दुकाने उघडे ठेवण्यास मज्जाव करू नये, अशी मागणी जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे सचिव ललित बरडिया यांनी केली आहे.