सुनील पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्रशासनाने कडक निर्बंध शिथील करुन जनजीवन व बाजारपेठ पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सौम्य निर्बंध मात्र कायम ठेवले आहे. सकाळी ९ ते रात्री ९ बारा तास सर्व आस्थापना सुरु करण्यासह रात्री ९ वाजेनंतर कोणतेही दुकान उघडे राहणार नाही व नागरिकांनाही फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रशासनाचे हे आदेश कागदावरच असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या पाहणीत दिसून आले.
शहरातील महामार्गावरील मुख्य चौक, शहरातील प्रमुख मार्ग, चौक, उद्यान आदी ठिकाणच्या सर्वच आस्थापनांची गुरुवार, शुक्रवार व शनिवार असे सलग तीन दिवस ‘लोकमत’ ने पाहणी केली असता ते सुरु असल्याचे दिसून आले. यात फक्त वाईन शॉप या आस्थापना बंद असल्याचे दिसून आले. बियर बार मात्र शटर बंद करुन सुरु असल्याचे दिसून आले. कालंका माता चौक, तांबापुरा, मास्टर कॉलनी, अजिंठा चौक, नेरी नाका स्मशानभूमीजवळ, आकाशवाणी चौक, शिरसोली रोड आदी भागात भावपाजी, अंडापाव, चिकन, पानीपुरी आदी हातगाड्या सुरु असल्याचे दिसून आले.
कलेक्टर, एसपी बंगला परिसरात नाईट वॉक
जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे निवासस्थान असलेल्या काव्यरत्नावली चौकात रात्री ११ वाजेपर्यंत नागरिक रस्त्याने फिरताना दिसून आले. सिंधी कॉलनी, आकाशवाणी चौक, सागर पार्क ते थेट महाबळ तर दुसरीकडे डी मार्ट रस्त्याने नागरिक फिरत होते. मोहाडी रस्त्याने देखील नागरिक फिरत होते. या भागात दोन ठिकाणी कुल्फीच्या हातगाड्याही दिसून आल्या.
भजे गल्लीत पुन्हा जत्रा
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोरील भजे गल्लीत रात्री १० वाजेपर्यंत मद्यपींची जत्रा दिसून आली. काही किरकोळ हॉटेल व हातगाड्याही सुरु होत्या. मोठ्या हॉटेल्स व बार यांचे शटर बंद होते, मात्र आतमध्ये व्यवसाय सुरु होता. या भागात पोलिसांचा सतत वावर असतो, काही पोलीस तर या गल्लीचे ग्राहकच आहेत. प्रशासनाच्या कोणत्याही नियमांचे या भागात पालन होताना दिसले नाही. मुख्य बाजारपेठ असलेले फुले मार्केट, गोलाणी मार्केट, गांधी मार्केट व बी.जे.मार्केट येथील दुकाने मात्र कडकडीत बंद दिसून आली. कॉलनी भागातील किराणा दुकानेही बंद होती.
काय आहेत प्रशासनाचे आदेश
पहिल्या टप्प्यात १८ जिल्हे अनलॉक झाले. पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सीजन बेडवर रुग्ण उपचार घेत असतील तर तो भाग पहिल्या टप्प्यात अनलॉक झाला. या निकषात जळगाव जिल्हा येत असल्याने ७ जूनपासून जळगाव जिल्हा अनलॉक झाला आहे.यात संस्था व दुकाने यांचा नियमित व्यवहार सुरु करतानाच सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेचे बंधन निश्चित करण्यात आले आहे. रात्री ९ नंतर एकही दुकान, संस्था सुरु राहणार नाही तसेच विनाकारण बाहेर फिरायलाही मनाई आहे.