जळगाव : एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये असलेल्या जय अंबे टेंट हाऊसच्या गोडावूनला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना रविवारी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास घडली. या आगीत गोडावूनमधील टेंन्ट हाऊसचे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.टागोर नगरात वास्तव्यास असलेले वैभव नरेश परदेशी यांचे टेन्ट हाऊसचा व्यवसाय आहे. घराजवळच त्यांचे कार्यालय असून एमआयडीसीतील जी सेंक्टरमध्ये गोडावून आहे. याठिकाणी टेन्टचे संपूर्ण साहित्य ठेवलेले असतात. रविवारी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास सुरक्षारक्षक सुधाकर साबळे हा गेटजवळ पाणी मारत असताना त्याला गोडावूनमधून धूर निघताना दिसले. त्याने लागलीच इतर मजुरांच्या मदतीने पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच मनपाच्या अग्निशमन दलालासुद्धा आगीची माहिती दिली.संपूर्ण साहित्य जळून खाकटेन्ट हाऊसचे मालक इंदूर येथे गेले असल्यामुळे त्याने लागलीच त्यांचे भाऊ सागर परदेशी यांना संपर्क साधला. आग लागल्याचे कळताच सागर परदेशी यांनी गोडावूनकडे धाव घेतली. मात्र, आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे प्लॅस्टिकच्या खुर्च्या, बाकडे, स्टेज, कुलर, फॅन आदी साहित्य जळून खाक झाले. मनपाच्या अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. एक ते दीड तास आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. शॉर्ट सर्किटमुळे परदेशी यांच्या गोडावूनला आगल्याचे कळताच टेन्ट हाऊस असोसिएशनचे पदाधिकारीदेखील घटनास्थळी दाखल झाले होते.पोलिसात आगीची नोंदशॉर्ट सर्किटमुळे गोडावूनला लागलेल्या आगीत २० कुलर, ५०० खुर्च्या, सहा महाराजा सोफा, ८ महाराजा खुर्ची, ४०० सिलींग, ३०० मॅटिंग, दोन महाराजा स्टेज, मंडप आदी साहित्य जळून खाक झाले. सुमारे २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सागर परदेशी यांनी सांगितले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार अतुल वंजारी व गोविंदा पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. या आगीची एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.