न्हावी, ता.यावल : शेतात पिकांना विहीर, कूपनलिकेद्वारे पाणी देण्यासाठी विजेची आवश्यकता असतानाही वीज मीटर मागूनही मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, परिसरातील अर्धा डझन गावातील दोषयुक्त असलेले २२ मीटर बदलून मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करूनही त्यांच्या विनवणीकडे वीज कंपनीने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. गावात वीज मीटर लवकर मिळत नसून , संबंधितांनी लक्ष घालावे, अशी मागणी आहे.परिसरात न्हावी गाव तसे संपूर्ण शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. वीज वितरण कंपनीच्या न्हावी कार्यक्षेत्राच्या अंतर्गत न्हावी गावासह मारुळ, बोरखेडा, तीळ्या, अंधार मळी व मोहमांडली अशी सहा गाव येतात.न्हावी कार्यालयाच्या अंतर्गत एक साहाय्यक अभियंता, एक लाईनमन, सात वरिष्ठ तंत्रज्ञलागतात. त्यातील सात वरिष्ठ तंत्रज्ञापैकी सहा तंत्रज्ञ असून, वरिष्ठ तंत्रज्ञाचे एक पद रिक्त आहे. तीन कनिष्ठ तंत्रज्ञ आहेत. यापैकी एक भरलेले असून, दोन पदे रिक्त आहे. वरिष्ठ तंत्रज्ञ व कनिष्ठ तंत्रज्ञ अशी एकूण तीन पदे रिक्त आहेत. असे असले तरी अशा तीन रिक्त जागी बाह्य तीन विद्युत कर्मचारी कार्यरत आहेत. न्हावी कार्यालयाच्या अंतर्गत असे एकूण १२ जण कार्यरत आहेत.गावातून नवीन वीज जोडणीची सतत मागणी असते. सध्या नवीन जोडणी ऑनलाइन असल्याने नवीन मीटर जोडणी ही मीटर नसल्याने पेंडिंग आहे. आमच्याकडे मीटर नाही. आले की आम्ही लगेच क्रमाने मीटरची जोडणी करतो. मीटर आपल्याकडे स्टोअरला मीटर शिल्लक पाहिजे असा नियम नाही. ऑनलाइन नोंदणी असल्याने आम्ही मागणीही करीत नाही. ती पोर्टलवर किती नवीन मीटरची मागणी आहे ते दिसते. १२ एप्रिलला १६ मीटर आले. त्यातील नवीन १३ घरगुती मीटर दोन खेपचे व एक टेस्टिंगचे असे १६ मिटर बसवले असून, १२ एप्रिलपासून एकही मीटर शिल्लक नाही. आम्ही दोषयुक्त २२ मीटर नवीन मिळावे यासाठी वरिष्ठांना कळविले आहे. मीटरची वेळोवेळी मागणी करूनसुद्धा मीटर मिळत नाही.-धनंजय चौधरी, सहायक अभियंता, वीज वितरण कंपनी कार्यालय, न्हावी, ता.यावल
३१ मार्चला घरमालकाच्या नावाने डिमांड नोट भरली असून, वीज मीटर मिळाले नाही. लवकर मिळणे अपेक्षित आहे. त्यामध्ये तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालणे अपेक्षित आहे. -पंडित चौधरी, वीज ग्राहक, न्हावी, ता.यावल