जळगाव - जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पीकांची स्थिती सध्यातरी चांगली आहे. मात्र, या चांगल्या स्थितीतही कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण, जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना युरीया मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २० हजार मेट्रीक टन युरीयाचा तुटवडा असल्याची धक्कादायक माहिती दिली.
सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांना युरीया मिळत नसल्याची तक्रार केली. त्यावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडून युरीया मिळत नसल्याच्या तक्रारी येत असल्याचे सांगितले. याबाबत जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी सुरज जगताप यांच्याकडून माहिती घेतली असता, जिल्ह्यात तब्बल २० हजार मेट्रीक टन युरीयाचा तुटवडा असल्याचे सांगितले. तसेच कंपन्यांकडून नवीन रॅक उपलब्ध होत नसल्याचे सांगितले.
कृषी अधिक्षक म्हणतात साठा पुरेसा, जि.प.चे अधिकारी म्हणतात तुटवडाया बैठकीत पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जि.प.च्या कृषी अधिकाऱ्यांनी युरीयाचा तुटवडा सांगितला. तर कृषी अधिक्षक संभाजी ठाकूर यांनी मात्र २० हजार मेट्रीक टनचा साठा कृषी केंद्र चालकांकडे असल्याचे सांगितले. दोन्ही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत मोठी तफावत असल्याने कृषी विभागातच मोठा घोळ असल्याचे चित्र दिसून आले. तसेच युरीयाचा तुटवडा असतानाही कृषी विभागाकडून कारवाई होत नसल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
साठा करणाऱ्या केंद्र चालकांवर कारवाई कराजिल्ह्यात कृषी केंद्र चालकांकडून युरीयाचा साठा करून, लिकींगचे प्रकार वाढले असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. कृषी केंद्र चालकांकडून युरीयाचा साठा करून, कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असून, अशा कृषी केंद्र चालकांवर कारवाईची मागणी जिल्हा नियोजन समितीतील आमदारांनी केली. त्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी, कृषी विभागाला तत्काळ अशा कृषी केंद्रची तपासणी करून, कृषी चालकांवर कारवाईचे आदेश दिले.