ऑनलाईन लोकमत
जळगाव : नेत्रदान केल्याने अंध व्यक्तीस दृष्टी मिळणे शक्य असून प्रत्येकाने हा विचार अंगीकारला तर त्या व्यक्तीस ही सुंदर सृष्टी पाहता येऊ शकते. त्यामुळे नेत्रदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचा सूर नेत्ररोग तज्ज्ञांकडून उमटला. जागतिक नेत्रदान पंधरवडय़ानिमित्त नेत्रतज्ज्ञ संघटनेतर्फे जळगावात रविवारी जनजागृती पदयात्रा काढण्यात येऊन चर्चासत्र झाले, त्या वेळी नेत्रतज्ज्ञांनी हे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्य़ापासून या पदयात्रेस सुरुवात होऊन नेहरु चौकातून ती आयएमए सभागृहाजवळ पोहचली व या ठिकाणी चर्चासत्र झाले.
सुंदर जग पाहणे शक्य आज अनेकांना दृष्टी नसल्याने ते सुंदर जग पाहू शकत नाही. त्यामुळे नेत्रदान केल्यास गरजूंना याचा फायदा होऊन ते हे सुंदर जग पाहू शकतात, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. यासाठी लोकांमध्ये नेत्रदानाची चळवळ निर्माण होणे गरजेचे असल्याचाही सूर उमटला. या वेळी डोळ्य़ांची काळजी कशी घ्यावी व नेत्रविकारांच्या नवीन उपचार पद्धतीबाबत डॉ. नीलेश चौधरी, डॉ. शशांक बिदाये (नागपूर) यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र नेत्रतज्ज्ञ संघटनेचे सचिव डॉ. धमेंद्र पाटील, जळगाव नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या सचिव डॉ. दर्शना शहा यांनी आयोजित केलेल्या या पदयात्रेत शहरातील सर्व नेत्रतज्ज्ञ, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. पदयात्रेदरम्यान डोळ्य़ांची काळजी कशी घ्यावी, नेत्रदान जनजागृतीविषयीचे फलक डॉक्टरांनी हाती घेतले होते. यशस्वीतेसाठी नेत्रतज्ज्ञ तसेच मांगीलाल बाफना नेत्रपेढीचे संचालक व कर्मचा:यांनी सहकार्य केले.
मोतीबिंदूमुळे सर्वाधिक अंधत्वजगात 3 कोटी 70 लाख लोक अंध आहेत. यामध्ये भारतातील 1 कोटी 50 लाख लोकांचा समावेश आहे. म्हणजेच जगात सर्वाधिक अंधत्वाचे प्रमाण भारतातच आहे. त्यात देशातील एकूण अंधत्वापैकी 62.60 टक्के अंधत्व हे मोतीबिंदूमुळे आले आहे. त्याखालोखाल चष्माच्या नंबरचे 19.70, काचबिंदूमुळे साडे पाच ते सहा टक्के, बुबूळावरील डागामुळे 0.90 टक्के अंधत्व भारतीयांमध्ये आहे. जगातील तुलना पाहता भारतात हे प्रमाण जास्त असल्याने नेत्रदान चळवळ अधिक तीव्र होणे गरजेचे असल्याचेही डॉक्टरांनी आवाहन केले.