अमळनेर, जि. जळगाव - येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिराची टपाल खात्याने दखल घेतली असून मंगळवार, २६ मार्च रोजी मंदिराचे छायाचित्र असलेल्या विशेष पाकीटाचे आनावरण करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता या मंदिरात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.श्री मंगळदेव ग्रह मंदिराचे ज्वाज्वल्य, तेथील स्वच्छता, भाविकांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा, पारदर्शकता, सामाजिक जाणिवेचे भान यामुळे या मंदिराची ख्याती देशातील कानाकोपऱ्याच नव्हे तर परदेशातही पोहोचली आहे. राज्यातील बोटावर मोजण्याइतकीच मंदिरे ‘आयएसओ’ मानांकित आहेत. त्या श्रेयनामावलीत या मंदिराचा समावेश आहे. शहराच्या अर्थव्यवस्थेवर या देवस्थानाचा सुपरिणाम आता दृश्य स्वरूपात स्पष्टपणे दिसू लागला आहे. या सर्व बाबींचा परिपाक म्हणून टपाल खात्याने या मंदिराची दखल घेत श्री मंगळदेव ग्रह मंदिराचे छायाचित्र असलेले पाकीट अनावरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवार, २६ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता औरंगाबाद विभागाचे पोस्टमास्तर जनरल व्ही. एस. जयशंकर यांच्याहस्ते मंदिरातच पाकिटाचे अनावरण करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले हेदेखील उपस्थित राहणार आहेत. टपाल खात्याच्या पाकिटावर छायाचित्र असण्याचा प्रथम मान श्री मंगळदेव ग्रह मंदिराला मिळाला असल्याचा दावा संस्थानच्यावतीने करण्यात आला आहे.भाविकांनी या सोहळ््यास उपस्थित रहावे, असे आवाहन मंगळ ग्रह सेवा संस्थेने केले आहे.
अमळनेर येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिराची टपाल खात्याकडून दखल, मंगळवारी पाकिटाचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 5:14 PM