रावेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून मिरवणुकांवर बंदी घालून शहरातील सार्वजनिक व खासगी गणेशोत्सव मंडळांसह घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन रावेर नगरपालिकेतर्फे शहरातील नियोजित आठ मूर्ती संकलन केंद्रांमधून सहा विसर्जन रथांद्वारे केले जाणार आहे. यासाठी नपाचे ३४ कर्मचारी तैनात केले असून, रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या नेतृत्वाखाली तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील मराठा समाज मंगल कार्यालय, अग्रसेन भवन, साई मंदिर (अष्टविनायक नगर), महादेव मंदिर (संभाजी नगर), श्री स्वामी समर्थ केंद्र (विद्या नगर), श्री संत तुकाराम महाराज मंदिर (राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक), मारुती मंदिर (श्री स्वामी विवेकानंद चौक) फायर स्टेशन (आठवडे बाजार चौक) अशा आठही संकलन केंद्रांवर नपा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत संबंधित शहरवासीयांनी आपापल्या मंगलमूर्तीं या संकलन केंद्रांवर देण्याचे आवाहन नपा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. यासाठी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण अधिकारी सरफराज तडवी, शामकांत काळे, प्रभारी आरोग्य निरीक्षक युवराज गोयर व मुकादम यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत. दरम्यान, रावेर नगरपालिकेतर्फे सहा मिनी ट्रकमध्ये सजविण्यात आलेल्या विसर्जन रथांद्वारे तथा अंबिका व्यायामशाळा, राजे छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळा व रावेर विकास युवाशक्ती फाऊंडेशनच्या माध्यमातून शहरातील मंगलमूर्तीं संकलित करून आठवडे बाजार परिसरातील फायर स्टेशनमध्ये एकत्रितपणे संकलित करून नगरपालिका, पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने तापी नदीपात्रात विघ्नहर्ता श्री गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस निरीक्षक कैलास नागरे व सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली राज्य राखीव दल, दंगा नियंत्रण पथक, जिल्हा पोलीस दल, उपविभागीय अधिकारी पोलीस तुकडी, स्थानिक पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मानाच्या गणपतीचे होणार श्री नागझिरी कुंडात विसर्जन, शहरातील मानाचा गणपती असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मंगलमूर्तीं सुशोभित केलेल्या पालखीतून श्री पाराचा गणपती मंदिरात आणून आरती करण्यात येईल. दरम्यान, दुपारी २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास पालखीतून विघ्नहर्ता श्री गणरायाला थेट नागझिरी कुंडावर नेऊन परंपरागत विसर्जन सोहळा पार पडणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिली.
रावेर शहरातील नागझिरी नदीवरील स्वच्छ व सुसज्ज करण्यात आलेल्या याच नागझिरी कुंडात मानाचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंगलमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.