तळोदा : तळोदा आदिवासी प्रकल्प कार्यालयातील शिष्यवृत्ती घोटाळ्यातील तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुक्राचार्य दुधाळ यांना बुधवारी तळोदा न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी दिली. तळोदा प्रकल्प कार्यालयाअंतर्गत विद्याथ्र्याच्या शिष्यवृत्तीत सुमारे नऊ कोटी 34 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी चार महिन्यांपूर्वी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दुधाळ यांना निलंबीत करण्यात आले होते. तेंव्हापासून ते फरार होते. गेल्या आठवडय़ात हा विषय जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत चर्चेला आला आणि पोलिसांनी दुधाळ यांना मंगळवारी बीड येथून अटक केली. दुधाळ यांना तळोदा न्यायदंडाधिकारी श्री.अ.देशपांडे यांच्यासमोर उभे करण्यात आले होते. दुधाळ यांच्यावतीने अॅड.राजेश कुलकर्णी यांनी बाजू मांडली. तर सरकार पक्षातर्फे अॅड.डी.बी.वळवी यांनी बाजू मांडली. शिष्यवृत्ती घोटाळ्याची व्याप्ती व इतर संशयीतांना अटक करण्यासाठी कोठडीची मागणी केली. याशिवाय तपासी अधिकारी गिरीश पाटील, सतिष भामरे, तुकाराम पाटील यांनी गुन्ह्याची पाश्र्वभुमि न्यायालयासमोर सांगितली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकुण न्या.देशपांडे यांनी दुधाळ यांना 10 फेब्रुवारीर्पयत पोलीस कोठडी सुनावली. या घोटाळ्यातील इतर संशयीतांना देखील लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दुधाळ यांना न्यायालयात आणतांना मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. (वार्ताहर)
शुक्राचार्य कोठडीत
By admin | Published: February 04, 2016 12:22 AM