रावेर : कोरोनाच्या महामारीपासून आता अनलॉकमध्येही बँक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नावाखाली बँकेच्या प्रवेशद्वाराचे शटर बंद ठेवून बँक ग्राहकांना अडवले जात असल्याने मात्र महिला, ज्येष्ठ नागरिक व सामान्य ग्राहकांची आत प्रवेश मिळवण्यासाठी एकच झुंबड उडत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडत आहे. तथापि, बडे धनदांडगे शेतकरी, व्यापारी, कंत्राटदार, व्यावसायिक यांना थेट प्रवेश देत सामान्य ग्राहकांना वेठीस धरले जात असल्याने खानापूर येथील सेंट्रल बँक शाखेच्या ग्राहकांमधून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
खानापूर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही शाखा रावेर- बऱ्हाणपूर राज्य महामार्गावर आहे. राज्य महामार्गावरील प्रवासी वा वाहनचालकांना बँक व्यवस्थापनाच्या गलथान कारभाराचे दर्शन घडत आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनपासून आता अनलॉकमध्येही बँक व्यवस्थापनाने बँकेचे शटर बंद ठेवून कामकाज चालवले आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची एकीकडे सुरक्षितता जोपासली जात असताना मात्र; बँक प्रवेशद्वारावरील शटरमधून अग्रक्रमाने प्रवेश मिळवण्यासाठी उडणाऱ्या झुंबडमध्ये ज्येष्ठ नागरिक, बचत गटांच्या महिला व सामान्य ग्राहकांची कमालीची धडपड दिसून येते. त्यात मास्कचा वापर वा सोशल डिस्टन्सिंगला पूर्णतः हरताळ फासला जात असल्याने तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सेंट्रल बँक ऑफ इंडिया या शाखेच्या कार्यक्षेत्रासह कार्यक्षेत्राबाहेरील धनदांडगे शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक वा राजकीय पार्श्वभूमी असलेल्या ग्राहकांना थेट प्रवेश दिला जात असल्याने सामान्य ग्राहकांमधून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
बँक व्यवस्थापनाच्या या ढिसाळ व्यवस्थापनात रोजंदारीवरील कर्मचारी बँक ग्राहकांना उद्धट व अपमानास्पद वागणूक देत असल्याचा सूर व्यक्त होत आहे. तत्संबंधी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या क्षेत्रीय महाव्यवस्थापकांनी गांभीर्याने दखल घेऊन सामान्य ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.