रावेर : तालुक्यातील लालमाती आश्रमशाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थी आकेश जगन बारेला (वय ६) याचा सिकलसेलने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष सर्वप्रथम ‘लोकमत’ ने चव्हाट्यावर आणला असता, गुरुवारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराय पाटील यांच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या पथकाने १९९ विद्यार्थ्यांचे रक्ताच्या नमुन्यांची तपासणी केली असता ३५ विद्यार्थी हे सिकलसेलने बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.‘सिकलसेल’ या असाध्य आजाराने लालमाती आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांवर विळखा घातल्याने विद्यार्थ्यांना सकस आहार पुरवण्याबाबत कसूर झाल्याचे दिसते. यासह तब्बल सात महिन्यांपासून सिकलसेल आजाराचे निदान करण्यात कमालीची कसूर झाली आहे.दरम्यान मयत आकेशच्या वैद्यकीय अहवालानुसार ‘सिकलसेल’ चे निदान लोकमत ने आवर्जून प्रसिद्ध केल्याने आरोग्य विभाग खडबडून जागी झाला. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराय पाटील यांनी लोहारा, खिरोदा व वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा तंत्रज्ञांचे पथक घेऊन शाळेतील पटलावरील १९९ विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ३५ विद्यार्थी सिकलसेल आजाराने बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित ३५ विद्यार्थ्यांना लोहयुक्त व व्हिटॅमीन बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्यांचा औषधोपचार करण्यात आला.दरम्यान, शाळेतील विद्यार्थ्यांना सदर आश्रमशाळेत रक्तातील हिमोग्लोबीन वाढीसाठी हिरव्या भाज्या, फळे, दूध, अंडी वा मांसाहार असा सकस आहार देण्याबाबत शालेय व्यवस्थापनाकडून कसूर होत असल्याचा आरोप होत आहे. तर गत सात महिन्यांपासून केवळ शाळेच्या लॉग रजिस्टरवर शेरे लिहून अटल आरोग्य तपासणी मोहीम करीत तपासणी पथकाने आरोग्य तपासणीकडे पाठ फिरवल्याचा आरोप होत आहे. तत्संबंधी, जिल्हा प्रशासनाने या सिकलसेलने विळखा घातलेल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची, भोजनाची, तथा आरोग्य तपासणीत आढळून येत असलेला हलगर्जीपणाची कसून चौकशी करावी अशी मागणी होत आहे.दरम्यान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य मिशनचे जिल्हा समन्वयक डॉ. वर्षा वाघमारे व रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एन.डी. महाजन यांनी लालमाती आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून व आरोग्य विभागाच्या विविध यंत्रणांकडून आजपावेतो झालेल्या आरोग्य तपासणी अहवालाचे त्यांनी कसून अवलोकन केले आहे.
सिकलसेलचा ३५ विद्यार्थ्यांना विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 8:43 PM