या खड्ड्यांमध्ये दुचाकी चालवल्याने दुचाकी चालकांच्या मणक्यांमध्ये गॅप पडणे, पाठीत दुखणे, कमरेत दुखणे यासारखे आजार वाढलेले आहेत.
चोपडा शहरात शिरपूरकडून येणारा रस्ता प्रवेश करतो; परंतु गलंगीपासून तर चोपडा शहरापर्यंत या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जवळपास हा रस्ता २५ ते २८ किलोमीटरचा असून, तात्काळ नवीन करणे गरजेचे आहे, तसेच अमळनेर तालुक्याकडून येणारा तापी नदी पुलापासून म्हणजेच निमगव्हाणपासून तर चोपडा शहरापर्यंत अत्यंत दयनीय अवस्था झालेला हा रस्ता आहे.
निमगव्हाण ते चोपडा शहर हा १२ किलोमीटरचा रस्ता नवीन करणे आवश्यक आहे. निमगव्हाणजवळ अनेक वेळा या रस्त्याची दुरुस्ती होऊनही प्रचंड खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमध्ये वाहन टाकल्याने दुचाकी वाहन चालकांच्या मणक्यांना धक्का बसल्याशिवाय राहत नाही, तसेच यावलकडून येताना धानोऱ्यापासून, तर चोपडा शहरापर्यंत अंकलेश्वर- बुऱ्हाणपूर रस्त्याचा हा भाग आहे. या रस्त्यातही मोठमोठे खड्डे पडले असून, खड्डे टाळण्याच्या नादात याच रस्त्यावर यापूर्वी अनेक जण अपघातात ठार झाले आहेत, म्हणून धानोऱ्यापासून ते चोपडा शहरापर्यंत जवळपास अठ्ठावीस ते तीस किलोमीटर रस्ता नवीन होणे गरजेचे आहे.
चोपडा तालुक्यातील मुख्य रस्ते का होत नाहीत?
चोपडा शहरात येणारे सर्वच रस्त्यांचे तीनतेरा झाले आहेत. यावल, अमळनेर, धरणगाव, बऱ्हाणपूर, शिरपूर इत्यादी भागाकडून येणारे रस्ते एकदम चांगले असून, चोपडा तालुक्यात प्रवेश करणाऱ्या सर्वच रस्त्यांची अवस्था मात्र दयनीय असल्याने हजारो खड्डे या सर्वच रस्त्यांवर पडले आहेत, म्हणून लोकप्रतिनिधींनी हे सर्व रस्ते रुंदीकरण करून नव्याने बनविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
चोपडा तालुक्यातील रस्त्यांचीच कामे का होत नाहीत? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
धुळे येथून अमळनेर तालुक्यातील सावखेड्यापर्यंत यायला ४५ मिनिटे लागतात. मात्र, सावखेड्यापासून म्हणजे तापी नदीच्या पुलापासून चोपडा शहरात यायला जवळपास ४५ मिनिटे लागतात. थेट धुळेपासून ते सावखेड्यापर्यंत रस्ता एकदम चांगला आहे. नवीन डांबरीकरण करून संपूर्ण रस्ता नवीन बनविण्यात आला, तसेच तापी नदीच्या पुलापासून नवीन बनविण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे धानोरा येथून चोपड्यापर्यंत रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. हा रस्ताही नवीन बनविणे गरजेचे आहे. चोपडा ते शिरपूर रस्त्याची तर बिकट अवस्था आहे. जयेश हॉटेलपासून ते हिंगोना फाट्यापर्यंत रस्ता बिकट स्थितीत आहे. हजारो खड्डे या रस्त्यावर पडले आहेत, तसेच काजीपुरा फाटा ते हातेड बुद्रुकदरम्यानचा रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. गलंगी येथेही मोठमोठे खड्डे रस्त्यावर आहेत.