लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातील रामदास कॉलनीमधील रामदास पार्क येथे नवीन उद्यान लोकसहभागातून विकसीत करण्याचा प्रस्ताव शहरातील काही सामाजिक संस्थानी दिला होता. मात्र, काही जणांच्या विरोधामुळे याठिकाणी हे काम सुरु होवू शकलेले नाही. याबाबत शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी रविवारी रामदास पार्कच्या उद्यानासाठी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली होती. यावेळी भाजपच्या दोन नगरसेविकांनी काही जणांमध्ये गैरसमज निर्माण केल्याने हे काम थांबले असल्याचे जोशी यांनी सांगितले आहे.
महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यानंतर शहरात लोकसहभागातून विकास कामे सुरु करण्याबाबतचे धोरण आखण्यात आले आहे. यासाठी जैन इरिगेशन, सुप्रिम कंपनी व पीपल्स बँकेसह इतर सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील रामदास कॉलनी परिसरातील मोकळ्या जागेवर उद्यान तयार करण्यासाठी एका संस्थेने पुढाकार घेत उद्यान विकसीत करण्याचा प्रस्ताव मनपाकडे दिला होता. मात्र, काही जणांचा याठिकाणी उद्यान तयार करण्यास विरोध आहे. त्यामुळे या कामाला सुरुवात होवू शकलेली नाही. हे काम व्हावे यासाठी शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी आग्रही असून, यासाठी नागरिकांचा व या भागातील रहिवाश्यांचा पाठींबा मिळावा यासाठी रविवारी रामदास पार्कचे उद्यान हवे की नाही ? यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविली आहे. तसेच सोमवारी देखील ही मोहिम सुरु राहणार आहे. नागरिकांचा पाठींबा मिळाल्यास याठिकाणी लोकसहभागातून चांगले काम होवू शकते असेही अनंत जोशी यांनी स्वाक्षरी मोहिमेदरम्यान सांगितले. काही जणांनी याबाबत गैरसमज पसरविले असून, ते दूर झाल्यास हे काम होवू शकते असे ही जोशी यांनी सांगितले.