जळगाव : मनपाच्या १२ मे रोजी झालेल्या महासभेत एकूण ७७ विषयांना मंजुरी देण्यात आली होती. आठ दिवसांमध्ये महापौर जयश्री महाजन यांनी सर्व ठरावांवर स्वाक्षऱ्या करून पुढील प्रक्रियेसाठी हे ठराव मंजूर केले आहेत. यामध्ये गाळे लिलाव व वॉटर ग्रेस प्रकरण लवाद नेमण्याचा ठरावांचा समावेश आहे.
जैविक कचरा संकलनाबाबत मनपात बैठक
जळगाव : शहरातील रुग्णालयांमध्ये जमा होणारा जैविक कचरा संकलनासाठी प्रत्येक रुग्णालयाकडून मन्साई कंपनीकडून प्रत्येकी १५ हजार रुपये घेतले जातात. ही रक्कम कमी करण्यासंदर्भात गुरुवारी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या दालनात आयएमएच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत आयएमएचे अध्यक्ष डॉ. सी.जी. चौधरी, सचिव डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह ठेकेदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्राथमिक स्वरूपात ही बैठक झाली असली तरी पुढील बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
मनपाकडून पाच दुकाने सील
जळगाव : शहरात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या अजूनही कायम असताना, दुसरीकडे शहरातील गर्दीवर अजूनही कोणताही अंकुश लागताना दिसून येत नाही. गुरुवारीदेखील शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आढळून आली, तसेच काही दुकानदारांकडून अजूनही लपूनछपून व्यापार केला जात आहे. गुरुवारी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी पाच दुकानांवर कारवाई केली आहे. पाचही दुकाने सील करून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंडदेखील या दुकानदारांवर ठोठावण्यात आला आहे. यामध्ये शहरातील चैतन्य मेडिकलचादेखील समावेश आहे.