चुडामण बोरसेजळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या महत्वाकांक्षी ‘सिलेज’ प्रकल्पांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील तीस गावांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारीत उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने वेग घेतला आहे. या प्रकल्पासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, मुंबई यांच्याकडून १३ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यामुळे शहर आणि खेडे यांच्या सुविधांचे होणार एकत्रिकरण होणार आहे.राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष व अणूशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी या प्रकल्पाला आकार दिला. गेल्या चार महिन्यांपासून या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, अक्राणी, धडगाव आणि अक्कलकुवा या चार तालुक्यांमधील तीस गावांमध्ये टप्प्या टप्प्याने हे उपक्रम राबविले जाणार आहेत. विद्यापीठाला या प्रकल्पासाठी नंदुरबार येथील हेडगेवार सेवा समितीचे कृषी विज्ञान केंद्र आणि बायफ या संस्थेचे सहकार्य प्राप्त होत आहे. विद्यापीठातील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी भवन येथे या प्रकल्पाचे कार्यालय सुरु झाले आहे. या साठी सोळा जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.५ के.व्ही.ए. सोलार पॉवर प्लॅट (ई-व्हेकल चार्जिंग स्टेशन) सध्या विद्यापीठात कार्यान्वीत करण्यात आले आहे. बहुउपयोगी फोरव्हील ड्राईव्ह वाहन खरेदी करण्यात आले असून याच गाडीवर २ के.व्ही.ए. मोबाईल सोलार पॉवर प्लॅॅट कार्यान्वीत केले जाणार आहे. जैविक खते, औषधी वनस्पतींची रोप वाटीका, पोषक अन्नद्रव्ययासाठी लागणारे प्राथमिक संशोधन देखील सुरु करण्यात आले आहे. या गावांमध्ये समृध्दी कशी आणता येईल यावर त्यांनी आता संशोधन सुरु केले आहे.प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मनुष्यबळाची व्यवस्थापनावर आधारित तीन दिवसीय कार्यशाळा बायफ संस्थेच्यावतीने पुणे येथे घेण्यात आली. या नवनियुक्त कर्मचाऱ्यांना शास्त्रज्ञ व सल्लागार डॉ. अजित पाटणकर यांनी दोन दिवस मार्गदर्शन केले. किसान सुविधा केंद्र आणि महिला तंत्रज्ञान पार्क सुरु करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रकल्पामार्फत साक्री, दहिवेल, मोराणे, शहादा आणिं लोहारा या गावांमध्ये बालविज्ञान मेळावे घेण्यात आले.नंदुरबार येथील आदिवासी अकादमीच्या प्रांगणात या प्रकल्पाच्या ‘प्रकृती’ या इमारतीचे बांधकाम देखील सुरु करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी कार्यक्रम अंमलबजावणी समिती, कार्यक्रम नियंत्रण व आढावा समिती, वित्त समिती तसेच सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे.- प्रा.पी.पी.पाटील, कुलगुरु विद्यापीठ, जळगाव.
‘सिलेज’ : शहर आणि खेडे यांच्या सुविधांचे होणार एकत्रिकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 12:05 PM