विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या भावात सतत मोठा चढ-उतार होत असून सोमवार, १० जून रोजी चांदीच्या भावात दोन हजार ९०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदी ८९ हजार ३०० रुपये प्रति किलोवर आली आहे. सोनेही २०० रुपयांनी घसरून ७१ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे. चांदीच्या भावातील मोठ्या बदलाने सराफ व्यावसायिकही संभ्रमात पडले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला १ जून रोजी चांदी ९२ हजारांवर होती. तिचे भाव कमी-कमी होत जाऊन ५ जून रोजी ती ८९ हजार २०० रुपये प्रति किलोवर आली होती. त्यानंतर लगेच ६ जून व ७ रोजी प्रत्येकी एक हजार ८०० रुपयांची अशी दोन दिवसात एकूण तीन हजार ६०० रुपयांची वाढ झाली होती. ८ जून रोजी मात्र ६०० रुपयांची घसरण झाली. त्यानंतर सोमवार, १० जून रोजी थेट दोन हजार ९०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी पुन्हा एकदा ९० हजारांच्या आत आली आहे.
पाच दिवसात तीन वेळा मोठा बदल
गेल्या पाच दिवसात चांदीच्या भावात मोठा चढ-उतार झाला आहे. ६ जून रोजी एक हजार ८०० व ७ रोजीदेखील तेवढीच वाढ झाल्याने त्या दोन दिवसात चांदी तीन हजार ६०० रुपयांनी वधारली. ही वाढ होत नाही तोच सोमवार, ९ जून रोजी थेट दोन हजार ९०० रुपयांनी घसरण झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर दलालांकडून अचानक चांदीची खरेदी-विक्री वाढविली जात असल्याने हा बदल होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र सततच्या या मोठ्या चढ-उताराने सराफ व्यावसायिक संभ्रमात पडले आहे, असे व्यावसायिक भागवत भंगाळे यांनी सांगितले.