कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्णपेढ्या बंद असताना कमोडिटी मार्केटमध्ये सोने-चांदीच्या भावात वाढ झाली. त्यानंतर १ जूनपासून सुवर्णपेढ्या सुरू झाल्या व काही दिवस भाव चढेच राहिले. यात चांदी ७२ हजारांवर तर सोने ५० हजारांवर पोहोचले होते. त्यानंतर मात्र सोने-चांदीत घसरण होत गेली व गेल्या आठवड्यात २१ जून रोजी सोने ४८ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते. २५ रोजी त्यात आणखी घसरण होऊन ते ४७ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर आले. त्यानंतर ४८ हजारांपर्यंत सोने पोहोचले व सोमवार, २८ जूनलादेखील ते याच भावावर कायम होते.
चांदीतही घसरण होत जाऊन गेल्या आठवड्यापर्यंत ती ६९ हजार ५०० रुपयांपर्यंत आली व आठवडाभर त्याच भावावर ती कायम राहिली. त्यानंतर २८ जून रोजी त्यात पुन्हा ५०० रुपयांची घसरण झाली व चांदी ६९ हजार रुपये प्रति किलोवर आली. आंतराष्ट्रीय पातळीवर मागणी कमी असल्याने भाव कमी होत असल्याचे सांगितले जात आहे.