लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सोमवारी दोन हजार ५०० रुपयांची घसरण झालेल्या चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी पुन्हा एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती ६५ हजार रुपये प्रति किलोवर आली आहे. सोने मात्र ४७ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर स्थिर आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी कमी झाल्याने सोमवार, ९ ऑगस्ट रोजी सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली. यात सोमवारी चांदीत दोन हजार ५०० रुपयांची घसरण झाल्यानंतर मंगळवार, १० ऑगस्ट रोजी पुन्हा एक हजार ५०० रुपयांची घसरण झाली. यामुळे चांदी थेट ६५ हजार रुपये प्रति किलोवर आली. अशाच प्रकारे सोमवारी एक हजार ३०० रुपयांनी घसरण झालेल्या सोन्याचे भाव मात्र मंगळवारी ४७ हजार ४००रुपये प्रति तोळ्यावर स्थिर आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक मागणीदेखील कमी झाल्याने हा परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.
जानेवारीनंतर सर्वात कमी भाव
गेल्या वर्षापासून मोठी भाववाढ होऊन सोन्यापेक्षाही अधिक भाव झालेल्या चांदीच्या भावात अचानक मध्येच मोठी घसरण तर कधी मोठी भाववाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये ९ जानेवारी २०२१ रोजी चांदीच्या भावात एकाच दिवसात पाच हजार ८०० रुपयांची घसरण होऊन चांदी ६४ हजार ५०० रुपयांवर आली होती. त्यानंतर लगेच ११ जानेवारी रोजी पुन्हा एक हजार ५०० रुपयांची घसरण झाली व चांदी ६३ हजार रुपये प्रति किलोवर आली होती. त्यानंतर मात्र भाववाढ होत गेली होती. ९ जानेवारीनंतरचे आता १० ऑगस्ट रोजीचे हे भाव सर्वात कमी आहे.