चाळीसगाव, जि. जळगाव : म्हाळुंगे बालेवाडी येथे मंगळवारी पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत खेडी खेडगावचा कुस्तीगिर सोपान माळी याने चमकदार कामगिरी करुन जिल्ह्याला रौप्य पदकाचा सन्मान मिळवून दिला. त्याला येथील पहिलवान व तालुका कुस्तीगीर संघाचे सचीव सुनील देशमुख यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.सोपान माळी याने आपले कुस्तीतील चापल्य दाखवतांना पहिल्या फेरीत वाशिमच्या गोपाल जहिरावला तांत्रिक गुणांवर पराभूत केले. दुस-या फेरीत त्याचा मुकाबला ठाणे शहराचा राज पाटील याच्याशी झाला. त्याला चितपट करीत सोपानने तिस-या फेरीत धडक मारली. बीडच्या श्रावण घुगे यालाही चितपट करुन विजयी सलामी दिली. चौथ्या फेरीत अहमदनगरच्या वैभव डेंगळेला गुणांवर पराभूत केले. उपांत्य सामान्यात कल्याणच्या लखन म्हामेला पराभवाची धूळ चारतांना अंतिम फेरीत आपले आव्हान उभे केले. शेवटच्या सामन्यात मात्र पुण्याच्या सुरज कोकाटे याने सोपानची विजयी घौडदौड थांबवून त्याच्यावर मात केली.कुस्तीगीर सोपान माळीला मान्यवरांच्या हस्ते रौप्य पदक बहाल करण्यात आले. माजी आमदार राजीव देशमुख, गोपालदास अग्रवाल, शामसुंदर शुक्ल, शिवाजी राजपूत आदिंच्या उपस्थितीत सोमनाथ माळीचा सत्कार करण्यात आला. 'कुस्ती पंढरी' म्हणून चाळीसगावची राज्यभर ख्याती असून ट्रिपल महाराष्ट्र केसरी ठरलेले डिवायएसपी विजय चौधरी यांनी येथील मातीची रग महाराष्ट्राला दाखवली आहे. सोपान माळीने देखील जिल्ह्याला रौप्य पदक मिळवून दिल्याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर चाळीसगावची अभिमानास्पद नाममुद्रा उमटल्याचे प्रतिपादन राजीव देशमुख यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत चाळीसगावच्या सोपान माळीला रौप्य पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 1:03 PM