जळगाव : गेल्या आठवड्यात मोठी घसरण झालेल्या चांदीचे भाव स्थिर राहिल्यानंतर शनिवारी त्यात ५०० रुपयांची वाढ होऊन चांदी ६२ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली. सोन्याचे भाव मात्र ४७ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर स्थिर आहे.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच सोने-चांदीच्या भावात घसरण सुरू होती. त्यात गेल्या आठवड्यात तर १७ सप्टेंबर रोजी दोन हजार रुपयांनी घसरण होऊन चांदी ६२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली होती. त्यानंतर १८ रोजी पुन्हा एक हजाराने घसरण होऊन ती ६१ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली होती. आठवडाभर भाव मात्र स्थिर राहिले. त्यानंतर शनिवार, २५ सप्टेंबर रोजी चांदीत ५०० रुपयांची वाढ झाली व ती ६२ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली.
गेल्या आठवड्यात १७ रोजी सोन्याच्या भावात ५५० रुपयांची घसरण होऊन ते ४७ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते. तेव्हापासून ते याच भावावर स्थिर आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी कमी झाल्याने गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात घसरण सुरू आहे. याचा परिणाम होण्यासह अमेरिकन डॉलरच्या दराचाही परिणाम होत असल्याने भाव कमी झाले व आता काहीसी वाढ झाली.
- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव सराफ बाजार असोसिएशन.