जळगाव : मंगळवारी एक हजार रुपयांनी घसरण झालेली चांदी बुधवार, ३० डिसेंबर रोजी ५०० रुपयांनी वधारली. यामुळे चांदीचे भाव ६९ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. सोन्याचे भाव मात्र ५० हजार ८०० रुपयांवर स्थिर आहे.
दोन दिवसांपूर्वी एक हजार ५०० रुपयांनी वाढ झालेल्या चांदीच्या भावात मंगळवार, २९ डिसेंबर रोजी एक हजार रुपयांनी घसरण झाली होती. त्यामुळे चांदी पुन्हा ७० हजार रुपयांखाली येऊन ६९ हजार रुपये प्रतिकिलोवर आली होती. बुधवारी मात्र पुन्हा चांदीच्या भावात ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ६९ हजार ५०० रुपयांवर पोहोचली. गेल्या १० दिवसांपासून सातत्याने सोनेचांदीच्या भावात चढउतार सुरूच आहे. सट्टा बाजार व अमेरिकन डॉलरचे दर यामुळे भाव कमीजास्त होत असल्याचे सांगण्यात येत आहे.