लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : या आठवड्याच्या सुरुवातीलाच घसरण झालेल्या सोने-चांदीच्या भावात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवार, १४ ऑगस्ट रोजी भाववाढ झाली. यामुळे चांदी एक हजाराने वधारून ६६ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली तर सोन्यातही ५०० रुपयांनी वाढ होऊन ते ४८ हजार ३०० रुपयांवर पोहोचले.
गेल्या अनेक दिवसांपासून किरकोळ चढ-उतार असलेल्या सोन्या-चांदीच्या भावात सोमवार, ९ ऑगस्ट रोजी मोठी घसरण झाली होती. सोन्याच्या भावात एकाच दिवसात १ हजार ३०० रुपयांनी घसरण होऊन ते ४७ हजार ४०० रुपयांवर आले होते. तसेच चांदीतही २ हजार ५०० रुपयांनी घसरण होऊन ती ६६ हजार ५०० रुपयांवर आली होती. त्यात पुन्हा मंगळवारी १ हजार ५०० रुपयांची घसरण झाली व ती ६५ हजारांवर आली होती. तेव्हापासून ती याच भावावर स्थिर होती. मात्र शनिवार, १४ रोजी १ हजार रुपयांची वाढ होऊन चांदी ६६ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. सोने चार दिवस स्थिर राहिल्यानंतर शुक्रवारी त्यात ४०० रुपयांची वाढ झाली व शनिवारी पुन्हा ५०० रुपयांची वाढ होऊन ते ४८ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.