लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : गेल्या आठवड्यात मोठी घसरण झालेल्या चांदीच्या भावात पुन्हा वाढ सुरू झाली असून तीन दिवसांत चांदी दोन हजार ५०० रुपयांनी वधारली. त्यामुळे शुक्रवार, २१ जून रोजी चांदी ९१ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली. या सोबतच सोनेही तीन दिवसात ८०० रुपयांनी वधारुन ७३ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे.
मे महिन्यात मोठी भाववाढ होऊन ९४ हजारांपर्यंत पोहचलेल्या चांदीच्या भावात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून घसरण सुरू झाली होती. १४ जून रोजी चांदी ८८ हजार ५०० रुपयांवर आली होती. त्यानंतर चार दिवस पुन्हा चढ-उतार सुरू राहिला व १८ रोजी ती ८९ हजार रुपयांवर आली. १९ जून व २० जून रोजी प्रत्येकी एक-एक हजार रुपयांची वाढ होऊन चांदी ९१ हजार रुपयांवर पोहचली. शुक्रवार, २१ जून रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाली व चांदी ९१ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली.
दुसरीकडे सोन्याचेही भाव तीन दिवसात ८०० रुपयांनी वधारले आहेत. १९ जून रोजी ७२ हजार २०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात २० रोजी ३०० रुपयांची वाढ होऊन ते ७२ हजार ५०० रुपयांवर पोहचले. त्यानंतर शुक्रवार, २१ जून रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ होऊन सोने ७३ हजार रुपये प्रति तोळा झाले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर दलालांनी अचानक मागणी वाढवल्याने सोने-चांदीच्या भावात वाढ होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.