जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर संस्था, त्याचे प्रशासक व इतर तीन अशा पाच ठिकाणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सकाळी एकाच वेळी छापे टाकले. दोन पोलीस उपायुक्त, तीन सहायक उपायुक्त, नऊ पोलीस निरीक्षक, १० सहायक/उपनिरीक्षक अशा एकूण १३५ जणांचे पथक जळगावात दाखल झाले.
बीएचआर संस्थेत झालेला अपहार, गुंतवणूकदारांची थकीत असलेली देणी न देणे, त्याशिवाय संस्थेच्या मालमत्तेची कवडीमोल दराने झालेली विक्री याची चौकशी करण्यासाठी हे पथक दाखल झाले आहे. सकाळी सात वाजता अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या शिवाजी नगरातील घरी पथक धडकले. उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी तेथे घरझडती घेतली.
एका पथकाला कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी थांबवून नवटके संस्थेच्या एमआयडीसीतील मुख्य कार्यालयात दाखल झाल्या. येथे ४५ जणांच्या पथकाने चौकशीचे सूत्र हाती घेतले. त्याशिवाय उद्योजक सुनील झंवर, पतसंस्था ठेवीदार संघटनेचे विवेक ठाकरे आदींच्या निवासस्थानी झडती सुरु होती.