लोकमत न्यूज नेटवर्क
पातोंडा, ता. अमळनेर : येथील संदीप श्रीराम बिरारी या तरुणाने रेल्वे प्रवासात सापडलेली पाच हजार पाचशे त्र्याहत्तर रुपये व दहा ग्रॅम सोने (चेन) व कागदपत्रे असलेली बॅग परत केली. या प्रामाणिकपणाबद्दल रेल्वेकडून संदीप बिरारी याचा सन्मान करून एक महिन्याचा लोकल रेल्वे प्रवासाचा पास मोफत देण्यात आला.
संदीप बिरारी हा तरुण ॲग्रो कंपनीत कामाला असून तो सध्या शहापूर येथे राहतो. कामानिमित्त टिटवाळा ते शहापूर येथे रात्री घरी परतत असताना प्रवासात त्यांना एक बॅग आढळून आली. बॅग उघडून पाहिल्यावर त्यांना बॅगेत पाच हजार पाचशे त्र्याहत्तर रुपये रोख, दहा ग्रॅम सोन्याची चेन, जेवणाचा डबा व आवश्यक कागदपत्रे आढळून आली. ही बॅग पाली (ता. सुधागड जि. रायगड) येथील भावेश मांडवळकर नामक व्यक्तीची असल्याचे समजले.
सुदैवाने बॅगेतील एका कागदावर मोबाइल नंबर असल्याने त्या व्यक्तीशी संपर्क साधून आपण आसनगाव स्टेशनवर येऊन आपली बॅग घेऊन जाण्याबाबतची माहिती संदीप बिरारी यांनी या व्यक्तीस दिली. ही व्यक्ती आसनगाव स्टेशनवर आल्यावर रेल्वे पोलीस व तिकीट तपासनीस यांच्या उपस्थितीत भावेश मांडवळकर याच्या हवाली केल्यावर सर्वांनी संदीपच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. प्रामाणिकपणाचा सन्मान म्हणून रेल्वे विभागाकडून संदीप यास एक महिन्याचा लोकलचा पास मोफत दिला.