लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : म्यूकरमायकोसिसच्या नॉन कोविड असलेल्या रुग्णांच्या कक्षात जावून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पाहणी केली. नॉन कोविड रुग्णांचा हा कक्ष गुरूवारपासूनच सुरू करण्यात आला आहे. एकाच दिवसात या ठिकाणी ११ नव्या रुग्णांची भर पडली आहे. ही संख्या १३ वर पोहोचली आहे.
या कक्षात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडून माहिती घेतली. दरम्यान, आता जळगावच्या रुग्णांची हेळसांड होणार नाही, त्यांना नाशिक, मुंबई, पुणे येथे जाण्याची गरज नसल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
अधिष्ठाता डॉ.रामानंद यांच्या दालनात कान, नाक, घसा तज्ञ डॉ. अक्षय सरोदे यांनी पालकमंत्री पाटील यांना म्यूकरमायकोसीस शस्त्रक्रिया व उपचारसाठी आवश्यक मशिनरींबाबत माहिती दिली व आपल्याला कोणती साहित्ये लागणार आहेत, ते सांगितले. म्यूकरची पहिली शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमचा पालकमंत्र्यांनी सत्कार केला. यासह लहान बालकांसाठी असलेल्या दहा व्हेंटीलेटरचे लोकार्पणही केले. दरम्यान, आगामी तिसऱ्या लाटेसाठी आपण सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण आदींसह प्रमुख डॉक्टर व अधिकारी उपस्थित होते.
उपकरणांनाही मंजूरी
या रुग्णालयात काही उपकरणे आणखीन लागणार असून त्यासाठी रुग्णालयाने मागणी केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजनमधून या उपकरणांना मंजूरीही दिली आहे. असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तिसऱ्या लाटेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, रामदेव बाबा हे डब्ल्यूएचओ पेक्षा मोठे आहेत का आपल्याला माहित नाहीत, मात्र, रुग्ण जिथे बरा होतो, जेथे निदान होते, अशाच ठिकाणी रुग्णांनी उपचार घ्यावेत, असा सल्ला मी देईल, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.
रुग्णांना नाक, डोळे, जबड्याला त्रास
नॉन कोविड कक्षात दाखल म्यूकरच्या १३ रुग्णांना साधारणत: नाक, डोळे आणि जबडा यामध्येच संसर्ग झाला असून त्यांच्यावर विविध पातळ्यांवर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी दोन रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.