लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शाहू महाराज रुग्णालयात ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीवरून नागरिकांनी शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास संताप व्यक्त केला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे तसेच आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या भेटीदरम्यान नागरिकांनी त्यांच्या व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
१८ ते ४५ वर्षे वयोगटाचे लसीकरण आणि ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण एकत्र होत असल्याने गोंधळ अधिक वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठांना दुसऱ्या डोससाठी ताटकळत रहावे लागत असल्याचे चित्र अनेक केंद्रांवर दिसत आहे. त्यामुळे सकाळपासून नागरिक केंद्रांवर येत आहेत. मात्र, त्यांना लस उशिरा मिळत असल्याने त्यांच्याकडून संताप व्यक्त होत आहे. यात शनिवारी शाहू महाराज रुग्णालयात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दुपारी केंद्रावर भेट दिली. मात्र, अधिकारी परतत असताना नागरिकांनी त्यांना थांबवून त्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी पोलीस अधीक्षकांनी नागरिकांची समजूत घातली व समस्या ऐकून घेतल्या. कूपननुसारच नंबर घेतले जातील शिवाय १८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाईन नोंदणीच असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले. यासह त्यांनी व आयुक्त कुलकर्णी यांनी प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांच्या कार्यालयात आढावाही घेतला आणि सूचनाही दिल्या.
कोट
१८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाईन नोंदणी आहे. मात्र, ४५ वर्षासाठी आपण ऑनस्पॉट नोंदणी ठेवली आहे. ऑनलाईन नाेंदणी असल्याने तरुणांना लसीकरण केले जाते, मात्र, ज्येष्ठांना नोंदणीला थोेडा वेळ लागतो. त्यामुळे गर्दी होत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, केंद्रांवर सोशल डिस्टन्सिंग पाळावे, लस उपलब्ध आहे आणि ती दिली जात नाही, असा गैरसमज करू नये.
- डॉ. राम रावलानी, प्रमुख वैद्यकीय अधिकारी
मंगळवारपासून स्वतंत्र नियोजन
मंगळवारपासून शहरात दोन्ही वयोगटासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहेत. शिवाय ४५ वर्षावरील नागरिकांच्या केंद्रांवर २५० कूपन दिले जाणार आहेत. त्यानुसार लसीकरण होणार आहे, असे डॉ. रावलानी यांनी सांगितले.