जळगाव : कोरोना रुग्णांबाबत नागरिकांना रुग्णांलयांची माहिती, ऑक्सिजन बेड, रेमडेसिविर इंजेक्शन आदी कोरोनाबाबत कुठल्याही माहिती वा तक्रारीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातच 'वाॅर रूम ' सुरू केली आहे. दिवसरात्र नागरिकांचे या ठिकाणी फोन येत असून, यामध्ये सर्वाधिक फोन हे रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीबाबत येत आहे. आमच्या रुग्णाची तब्येत अत्यंत खालावली असून, त्यांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळाले नाही तर त्यांचा जीव जाईल, अशी विनवणीदेखील रुग्णांच्या नातेवाईकांकडून केली जात असल्याची माहिती या वाॅर रूममधील कर्मचाऱ्यांनी दिली.
गेल्या महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने, जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा रुग्णालयात वॉर रूम सुरू करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना २४ तास माहिती मिळत आहे. यामध्ये कोरोना रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये ऑक्सिजन बेड कुठल्या रुग्णालयात आहे, व्हेंटिलेटर कुठे उपलब्ध आहे, रेमडेसिविर इंजेक्शन कुठे उपलब्ध आहे, कोरोना रुग्णालयात तालुकास्तरावर उपलब्ध आहे का, कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे नंबर आदी माहितीचे फोन ‘वाॅर रूम’मध्ये येत आहेत. यावेळी ‘वाॅर रूम’मधील संबंधित कर्मचारी तत्काळ त्या व्यक्तीला रुग्णालयांची माहिती, बेडची सुविधा आदी माहिती उपलब्ध करून देत आहेत. या ‘वाॅर रूम’मुळे नागरिकांना सर्व प्रकारची माहिती मिळत असल्यामुळे नागरिकांमधून या सुविधेबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
इन्फो :
६ जणांची ‘वॉर रूम’
जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या या वॉर रूममध्ये सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी दोन दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. या वॉर रूममध्ये दिवसा दोन तर रात्री चार कर्मचारी कर्तव्यावर असतात. प्रत्येक कर्मचाऱ्याकडे वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे नाव, दूरध्वनी व त्याच्या समस्येची नोंद या ठिकाणी करण्यात येत आहे.
इन्फो :
कोणाला हवे रेमडेसिविर इंजेक्शन तर कोणाला ऑक्सिजन
या वॉर रूममध्ये दिवसरात्र नागरिकांचे फोन येत असून, यात बहुतांश फोन हे रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीबाबत येत असल्याचे सांगण्यात आले. रेमडेसिविर इंजेक्शन कुठे मिळेल, कितीला मिळेल, आमच्या रुग्णाला या इंजेक्शनची खूप गरज आहे. कृपया सांगा हे इंजेक्शन कुठे मिळेल अशा प्रकारे काही नागरिक हे इंजेक्शन मिळण्याबाबत चौकशी करत आहेत तर काही नागरिक ऑक्सिजन बेड कुठे उपलब्ध आहे, रुग्णालयाचे नाव सांगा, तसेच व्हेंटिलेटर कुठे उपलब्ध आहे, रुग्णवाहिका कुठे मिळेल आदी माहितीचे फोन करीत असतात.
इन्फो :
दररोज या ठिकाणी जिल्हाभरातून फोन येत असतात. यात नाॅर्मल ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर तसेच रेमडेसिविर इंजेक्शनबाबत विचारणा केली जाते. रुग्णाला ज्या रुग्णालयात दाखल करण्याचे आहे, तेथील रुग्णालय प्रमुखांचाही दूरध्वनी दिला जातो. ज्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय टळते.
- नरवीरसिंह रावळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा वॉर रूम प्रमुख