जळगाव : बहिणीचा खून झाला हे माहीत होते, मात्र घटनास्थळावर पती-पत्नी यांच्याशिवाय तिसरे कोणीच नव्हते. पतीने आरोप नाकारला होता, डॉक्टर असल्याने त्याला कायद्याचे ज्ञान होते त्याशिवाय त्याचा दांडगा संपर्क त्यामुळे बहिणीला न्याय मिळेल, याची आशाच मावळली होती. मात्र पोलीस, डॉक्टर व वकील या तिन्ही यंत्रणांनी न्यायालयासमोर जे मजबूत पुरावे सादर केले, त्यातून आरोपींना शिक्षा झाली व बहिणीला न्याय मिळाला, अशी भावना ॲड. विद्या राजपूत यांचा चुलत भाऊ सुरेश पाटील (बोहर्डी, ता. भुसावळ) यांनी व्यक्त केली.
जळगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयातील सहायक सरकारी वकील विद्या ऊर्फ राखी भरत राजपूत (पाटील) रा. जामनेर, यांचा खून खटल्याचा निकाल हा दिल्ली येथील राष्ट्रीय संशोधन फौजदारी न्याय विभागाने अभ्यासक्रम व संशोधनासाठी घेतला आहे. त्यामुळे गुन्ह्याची तपासी यंत्रणा, वैद्यकीय अधिकारी व वकील यांचा मंगळवारी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे आदी उपस्थित होते. यावेळी ॲड. राजपूत यांच्या भावाला मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली. न्याय मिळवून देणाऱ्या यंत्रणेचे आभार मानताना त्यांना गहिवरून आले होते.
यांनी बजावली महत्त्वाची भूमिका
या खटल्याचा तपास करणारे जामनेरचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, खटला चालविणारे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश देवराज, डॉ. स्वप्निल कळसकर, जामनेरचे डॉ. हर्षल चांदा, तत्कालीन पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकाडे, जामनेर पोलीस ठाण्याचे रमेश कुमावत, जळगावचे नरेंद्र वारुळे, योगेश महाजन यांनी या गुन्ह्याच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावून आरोपींना शिक्षा दिली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याहस्ते या सर्वांचा मंगळवारी गौरव करण्यात आला. कातकाडे यांची जिल्ह्यातून बदली झाल्याने ते कार्यक्रमाला नव्हते.